प्रतिनिधी /वास्को
वास्को शहरातील स्वातंत्र्यपथ मार्गावरील श्रीधर बिल्डींगची अवस्था गंभीर बनलेली असुन या इमारतीचा धोका पादचाऱयांनाही सतातवत आहे. या इमारतीच्या स्लॅबचे तुकडे फुटपाथवर कोसळण्याचे प्रकार काही वेळा घडलेले आहेत.
वास्को शहरात बऱयाच इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. त्यात शहरातील रेल्वे स्थानक तसेच बँक ऑफ इंडियासमोरील श्रीधर या इमारतीचाही समावेश आहे. नगरपालिका मार्केटची पोर्तुगीजकालीन इमारत, पालिकेचीच जनता बिल्डींग, कोसंबे बिल्डींग, पालिकेचे निवासी गाळे, पोलीस स्थानका समोरील प्रेमावती बिल्डींग अशा अनेक इमारती धोकायदायक अवस्थेत असून त्या एखादय़ा दिवशी दुर्घटनेस कारणीभूत ठरू शकतात. सर्व धोकादायक इमारती रस्त्याच्या व लोकांच्या वर्दळीच्या ठिकाणीच असल्याने लोकांमध्ये या इमारतींबाबत भिती आहे. श्रीधर इमारतीनेही हल्ली लोकांच्या मनात भिती निर्माण केलेली आहे. इमारतीखालील फुटपाथवर छताच्या स्लॅबचे थर कोसळत असल्याने एखादय़ावर जखमी होण्याची पाळी येऊ शकते. नगरपालिका व आपत्ती व्यवस्थापन सारख्या विभागानी वास्को शहर व परीसरातील धोकादायक इमारतीची पाहणी करून लोकांच्या सुरक्षेसाठी तसेच दुर्घटना टाळण्यासाठी योग्य पावले उचलण्याची आवश्यकता लोकांमध्ये व्यक्त होत आहे.









