व्हॅक्सिन डेपो पोस्ट कार्यालयासमोरील प्रकार
बेळगाव : व्हॅक्सिन डेपो येथील पोस्ट कार्यालयासमोरील विद्युत वाहिन्या जमिनीलगत लोंबकळत आहेत. यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विद्युत वाहिन्यांचा अंदाज न आल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने हेस्कॉमच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील बऱ्याचशा भागात विद्युत वाहिन्या लोंबकळत आहेत. काही ठिकाणी तर हाताला लागण्याइतपत विद्युत वाहिन्या आल्याने धोका वाढला आहे. विद्युत वाहिन्यांचा स्पर्श होऊन मागील वर्षभरात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे अशा विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. व्हॅक्सिन डेपो येथील पोस्ट कार्यालयासमोर विद्युत वाहिन्या लोंबळकत असून त्याची माहिती हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. परंतु, त्याची दखल घेण्यात आली नसल्याने धोका वाढला आहे. सकाळच्यावेळी मॉर्निंग वॉकर्स या मार्गाने फिरत असतात. त्यामुळे या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवावी, अशी मागणी केली जात आहे.









