बेळगाव : शहरातील वर्दळीच्या असलेल्या टिळकवाडीतील पहिल्या रेल्वेगेट सिग्नलमध्ये मागील दोन दिवसांपासून बिघाड झाला आहे. त्यामुळे गेटमनला स्वत: हाताने गेट बंद करून रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूने वाहतूक रोखावी लागत आहे. त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना होण्यापूर्वी दुरुस्तीची मागणी केली जात आहे.
रेल्वेगेटवर बसविण्यात आलेले लोखंडी खांब हे सिग्नलवर वर-खाली होत असतात. रेल्वे येण्यापूर्वी काहीकाळ रेल्वेगेटजवळील लोखंडी खांब सिग्नलच्या इशाऱ्याने बंद होतात. परंतु मागील दोन दिवसांपासून पहिले रेल्वेगेटमधील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे गेटमनची जबाबदारी वाढली आहे. दिवसा तसेच रात्रीही गेटमनला लोखंडी खांब हाताने लावावा लागत आहे.
या परिसरात दररोज वाहतूक कोंडी होत असते. एका बाजूचे गेट बंद करून पुन्हा दुसऱ्या बाजूचे गेट बंद करावे लागत आहे. काही उन्माद वाहनचालक गेटमनला न जुमानता वाहने एका बाजूने दुसऱ्या बाजूला वेगाने घेऊन जात आहेत. यामुळे गेट बंद करण्यास विलंब होत असून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे वेळेत रेल्वेगेटची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.









