पहिल्या मजल्यावर हलवण्याकडे इमारतधारकांचे दुर्लक्ष
बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरांमध्ये सर्रास इमारतींमध्ये तळमजल्यात विद्युत मीटर बसविण्यात आली आहेत. परंतु, मागील आठ दिवसात झालेल्या धुवांधार पावसामुळे इमारतींच्या तळघरात चार ते पाच फूट पाणी साचले आहे. यामुळे धोका निर्माण झाला असून कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी विद्युत मीटर पहिल्या मजल्यावर हलवणे गरजेचे आहे. हेस्कॉमच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने धोका वाढला आहे. 2019 मध्ये बेळगावमध्ये झालेल्या पूरसदृश स्थितीमध्ये अनेक इमारतीत तळमजले पाण्याखाली होते. विद्युत मीटर तळमजल्यात असल्यामुळे जोवर पाणी कमी होत नाही, तोवर अपार्टमेंटमधील नागरिकांना अंधारात रहावे लागले. केवळ पहिल्या मजल्यावरील जागा वाचविण्यासाठी बिल्डरकडून तळमजल्यातच विद्युत मीटर बसविण्यात येत असले तरी नागरिकांच्या जीवाचा धोका वाढला आहे.
मोहिमेला पुन्हा खीळ
हेस्कॉमचे तत्कालिन साहाय्यक कार्यकारी अभियंता अरविंद गदगकर यांनी पूरस्थितीनंतर सर्व इमारतधारकांना नोटिसा पाठविल्या होत्या. त्यानंतर अनेक इमारतींमध्ये पहिल्या माळ्यावर विद्युत मीटर बसविले. परंतु, त्यानंतर या मोहिमेला खीळ बसली. परंतु, पावसामुळे तळमजल्यात असलेले मीटर पुन्हा एकदा जीवघेणा ठरले.
पाणी विद्युत मीटरमध्ये शिरल्याने मोठा धोका
अनेक ठिकाणी तळमजल्यात चार ते पाच फूट पाणी शिरले आहे. पाणी काढण्यासाठी विद्युत पंप लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी पाणी विद्युत मीटरमध्ये शिरल्याने इमारतीचे संपूर्ण कनेक्शन बंद ठेवावे लागले. हेस्कॉमला दुरुस्ती करतानाही अडचणी आल्या. त्यामुळे आता तरी इमारतधारकांनी विद्युत मीटर पहिल्या मजल्यावर बसविणे गरजेचे आहे.









