वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
डॅरेल मिचेल हा जखमी झाल्याने तिरंगी टी-20 मालिकेसाठी त्याच्या जागी यष्टीरक्षक आणि फलंदाज डेन क्लेव्हरचा समावेश करण्यात आल्याची घोषणा शनिवारी क्रिकेट न्यूझीलंडने केली.
मिचेलला दुखापत झाल्याने आगामी तिरंगी टी-20 मालिकेसाठी यष्टीरक्षक आणि फलंदाज डेन क्लेव्हरला न्यूझीलंड संघात संधी देण्यात आली. ऑस्ट्रेलियात होणाऱया आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी न्यूझीलंडचा संघ पुढील शनिवारी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. यंदा वर्षाच्या प्रारंभी यष्टीरक्षक-फलंदाज क्लेव्हरने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले. ख्राईस्टचर्चमध्ये क्लेव्हर शनिवारी न्यूझीलंड संघात दाखल झाला असून या तिरंगी मालिकेतील न्यूझीलंडचा पहिला सामना पाकविरुद्ध होणार आहे.
अष्टपैलू मिचेलला शुक्रवारी सराव करीत असताना त्याच्या हाताचे हाड मोडले. त्याच्या उजव्या हाताच्या करंगळीवर चेंडू आदळल्याने या करंगळीचे हाड मोडले असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
टी-20 तिरंगी मालिकेत यजमान न्यूझीलंड, पाक आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. या मालिकेतील अंतिम सामना 14 ऑक्टोबरला खेळविला जाईल. या स्पर्धेत सहभागी होणारे तीन संघ परस्परांविरुद्ध दोनदा राऊंड रॉबिन लीगमध्ये लढत देतील. या स्पर्धेतील हे सामने ख्राईस्टचर्चमध्ये खेळविले जातील. 15 ऑक्टोबरला न्यूझीलंडचा संघ ऑस्ट्रेलियाला प्रयाण करणार असल्याची माहिती या संघाचे प्रमुख प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी दिली.









