भेटीबाबत पाळली गुप्तता, माहिती देण्यास टाळाटाळ
पणजी : प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी शनिवार व रविवार असे दोन दिवस नवी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेतली आणि गोव्यातील अनेक विषयांवर चर्चा केली. दामू नाईक यांचा नवी दिल्ली दौरा बराच गुप्त राहिला. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपला दिल्ली दौरा झाला हे मान्य केले, मात्र कोणाला भेटलो आणि कोणती चर्चा झाली याबाबत कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ केली. गोव्यात अलीकडे वातावरण तापलेले असतानाच दामू नाईक यांचा दिल्ली दौरा हा देखील एक चर्चेचा विषय बनतो. शक्यतो सरकारी कार्यक्रमाला जाणे टाळणारे दामू नाईक यांनी पक्षाचे काम विविध भागात जोरात चालविले आहे. गेल्याच आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गोव्यात येऊन गेले होते. त्यांच्याशी वैयक्तिक चर्चा झाली नव्हती, मात्र पक्षश्रेष्ठींच्या निमंत्रणावरून अचानक दिल्लीला गेलेले दामू नाईक रविवारी रात्री उशिरा गोव्यात पोचले व सोमवारी ते प्रदेश भाजप कार्यालयातही उपस्थित होते.
जिल्हा पंचायत निवडणुकीची तयारी जोरात
एका प्रश्नाला उत्तर देताना दामू नाईक म्हणाले की लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होईल. त्यात जिल्हा पंचायत निवडणुकीसंदर्भात चर्चा केली जाईल. भाजपने आपले उमेदवार शोधण्याचे काम सुरू ठेवले आहे. ज्यावेळी सरकार निवडणुका निश्चित करेल, त्यानंतर लागलीच उमेदवारांची अंतिम यादी तयार केली जाईल. तत्पूर्वी राज्य कार्यकारणीची बैठक होईल. तसेच पक्षाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांबरोबरची बैठक होईल. त्यात उमेदवार कशा पद्धतीने निवडायचे याबाबत चर्चा होईल. दोन्ही जिल्हा पंचायतीवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकवणारच, असे दामू नाइक म्हणाले.
जुन्या नेत्यांना पक्षात पुन्हा घेणार
दामू नाईक यांनी पक्षामध्ये जुन्या नेत्यांना सन्मानाने फेर प्रवेश दिला जाईल, असे सांगितले. आम्हाला कोणीही परके नाहीत. जुन्यांचे कार्यदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. इथे मोठमोठ्या चुका करणाऱ्यांना पक्षात प्रवेश दिलेला आहे, मग आमच्या काही ज्येष्ठ नेत्यांकडून बारिकसारिक चुका झाल्या म्हणून त्यांना बाजूला ठेवता येणार नाही. आम्ही सन्मानाने त्यांना प्रवेश देण्यावर विचार करू. ज्यांना पक्षाची ध्येयधोरणे पसंत आहेत आणि पक्षाचे विचार घेऊन जर कोणी कार्य करीत असेल तर आम्हाला त्या व्यक्तींना पक्षात प्रवेश देण्यास कोणतीही अडचण नाही. पक्षाची तत्वे मात्र प्रत्येकाने सांभाळावीत, एवढीच माफक अपेक्षा आहे, असेही दामू नाईक यांनी सांगितले.









