जळगाव / प्रतिनिधी :
जळगाव जिल्ह्यातील तापमान हे 42 अंशावर गेले असून, या वाढत्या तापमानाने धरणसाठे आटण्यास सुरूवात झाली आहे. आज विविध धरणात असलेला जिवंत पाणीसाठा केवळ 43 टक्के असून, गेल्या वर्षी याच दिवशी तो 53 टक्के होता. बाष्पीभवन व अन्य कारणांनी धरणातील पाण्याची होणारी घट पाहता तसेच यंदा पाऊस उशीरा येण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणी जपून वापरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे.
जिल्ह्यात गिरणा, हतनूर आणि वाघूर ही तीन मोठी धरणे असून यंदा पावसाळयात ती 100 टक्के भरलेली होती. मात्र, आज गिरणा धरणात 29 टक्के, हतनूरमध्ये 61 टक्के तर जळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱया वाघूर धरणात 72 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी गिरणा धरणात 46 टक्के तर वाघूरमध्ये 82 टकके साठा होता. हतनूरमध्ये गेल्या वर्षी देखील 61 टक्के साठा होता. हतनूर धरण हे 50 टक्के गाळाने भरल्याने साठा हा फसवा असू शकतो. या तीन धरणात एकूण 47 टक्के पाणी असून गेल्या वर्षी 58 टक्के पाणीसाठा होता. जिल्हयात 13 मध्यम प्रकल्प असून, त्यात 43 टक्के साठा आहे तर 96 लघू प्रकल्प असून, 21 टक्के साठा आहे. अनेक लघू प्रकल्पातील साठा हा तळाला गेलेला आहे. सर्व पाणीसाठयांचा विचार करता जिल्हयात केवळ 43 टक्के साठा असून गतवर्षापेक्षा 10 टक्के कमी आहे.
जळगाव जिल्ह्याचे तापमान हे 45 अंशापर्यंत जात असल्याने हा साठा झपाटयाने कमी होयाची शक्यता आहे. तसेच भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार अल निनो या समुद्र प्रवणतेच्या सक्रीयतेमुळे पाऊस लांबण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास जुलैपर्यंत पाणी पुरवावे लागणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट झाले असून, जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. धरणे व अन्य ठिकाणाहून अवैधरित्या पाणी उचलणाऱ्यांच्या विरोधात त्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.