भात-ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान : त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी
प्रतिनिधी / खानापूर
ओलमणी परिसरात गेल्या आठ दिवसापासून गवीरेड्यांच्या कळपांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव सुरू असून त्यांनी शेतवडीत अक्षरश: हैदोस घातल्यामुळे भात व ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी वर्गाची झोपच उडाली आहे. वनखात्याने गवीरेड्यांच्या कळपांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे
ओलमणी परिसरातील शेतवाडीमध्ये गवीरेड्यांचा धुमाकूळमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यांच्याकडून नुकतीच लागवड करण्यात आलेल्या भात व ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. सध्या गवीरेड्यांच्या कळपाचे वास्तव्य मलप्रभा नदी काठावरील शेतवडीत असून एका गवीरेड्यांया कळपात साधारण 10 ते 12 गव्यांचा समावेश आहे. ते शेतवाडीमध्ये नुकतीच लागवड करण्यात आलेली भातरोपे फस्त करीत आहेत. तसेच भातपिके पायाखाली तुडवून देखील जमीनदोस्त करीत असल्यामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे भात पिकांची वाढ देखील खुंटली आहे. चालूवषी या भागात मान्सूनला विलंबाने सुऊवात झाल्यामुळे या भागातील भातरोप लागवडीला देखील उशिराने प्रारंभ झाला आहे. सध्या या भागातील भातरोप लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र शेतकऱ्यांनी काबाडकष्ट घेऊन लागवड केलेली भातरोपे गवीरेड्यांचे कळप रातोरात फस्त करीत असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला आहे. शेतकरी वर्ग कळपापासून भात पिकांचे संरक्षण करण्यासाठी रात्रीच्यावेळी शेतवडीत फेऱ्या मारून त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करीत असले तरी गवीरेड्यांचे कळप त्यांच्या प्रतिकारला जुमानत नसल्यामुळे शेतवडीतील पिकांचे कसे संरक्षण करावे असा प्रश्न शेतकरी वर्गाना भेडसावत आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी गवेरेड्यांनी माऊती सखाराम साबळे यांच्या काजू बागेतील सात ते आठ काजू झाडांची मोडून नुकसान केली आहे.
रानडुकराकडूनही ऊस पिकांचे नुकसान
सध्या या परिसरातील शेतवडीमध्ये भात, रताळी, ऊस आदी पिके आहेत. मात्र गवीरेड्यांबरोबरच भरीस भर म्हणून रानडुकरांच्या कळपाकडूनदेखील ऊस, भुईमूग, रताळी पिकांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रानडुकरे देखील रात्री व अगदी दिसाढवल्या देखील ऊस मळ्यात धुडगूस घालून नुकसान करीत आहेत.
नुकसानभरपाई देण्याची मागणी
वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या उपद्रवामुळे या भागातील शेतकरी वर्गाना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तरी जांबोटी विभागीय वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून ओलमणी परिसरातील गवीरेड्यांच्या कळपांचा बंदोबस्त करावा व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाई मंजूर करावी अशी मागणी शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे.









