शेतकऱ्यांना पुन्हा दुबार पेरणीची चिंता : शेतकऱ्यांची वाढीव भरपाईची मागणी
बेळगाव : बळ्ळारी नाल्याला आलेल्या पुरामुळे परिसरातील भातपीक पाण्याखाली गेले होते. गेल्या काही दिवसापासून भात सतत पाण्याखाली राहिल्याने ते कुजले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून, दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. दरवर्षी बळ्ळारी नाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत असले तरी नाल्याचा प्रश्न सोडवण्याकडे मात्र प्रशासनाने सोयिस्करित्या दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बळ्ळारी नाला हा शेतकऱ्यांसाठी शापच ठरला आहे. बळ्ळारी नाल्याच्या सफाईकडे आणि काँक्रिटीकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याने दरवर्षी पावसाळ्यात शेतकऱ्यांना नुकसान सहन करण्याची वेळ येत आहे. नाल्याचे पाणी व्यवस्थितरित्या पुढे वाहून जात नसल्याने अनेक ठिकाणी पाणी नाल्याबाहेर येत आहे. त्यातच हलगा-मच्छे बायपास रस्त्यासाठी शिवारात भराव टाकण्यात आला असल्याने पाणी वाहून जाण्याऐवजी शिवारातच तुंबून राहात आहे. गतवर्षीदेखील बळ्ळारी नाल्याला पूर आल्याने शेकडो एकर जमिनीतील भातपीक कुजून गेले होते.
त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार आणि तिबार पेरणी करावी लागली. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल, असे सांगितले जाते. पण प्रत्यक्षात शासनाकडून देण्यात येणारी आर्थिक नुकसानभरपाई अत्यंत तुटपुंजी आहे. शासनाकडून प्रति गुंठ्याला 38 रुपये प्रमाणे दिली जाते. पण शेतकऱ्यांना एक एकर शेतीसाठी 30 ते 40 हजार रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे शासनाने एकप्रकारे शेतकऱ्यांची थट्टाच चालविली आहे. यंदा बळ्ळारी नाल्याच्या कामाला सुरुवात होणार असे सांगितले जात होते. त्यामुळे शेतकऱ्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण यंदाही नाल्याच्या काँक्रिटीकरणाचे काम तर दूरच, पण साधी सफाईदेखील करण्यात आली नाही. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बळ्ळारी नाला परिसरातील भातशेती पाण्याखाली गेली होती. बरेच दिवस पाणी तुंबून राहिल्याने भात कुजले आहे. आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शिवारातील पाणी कमी होऊ लागले आहे. मात्र भात पूर्णपणे कुजले असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, शेतकऱ्यांना पुन्हा दुबार पेरणीची चिंता लागली आहे. कृषी खात्याने तातडीने नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे करून वाढीव नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.









