परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
वार्ताहर /गुंजी
गुंजीपासून जवळच असलेल्या भालके के एच या गावातील शेतवडीत कालपासून हत्तीने ठाण मांडले असून भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. बुधवारी रात्री परशराम यल्लाप्पा आळवणे यांची भातगंजी विस्कटून खाऊन तुडवून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. गुरुवारी सायंकाळी आळणे यांच्या पिकात शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. परशराम आळवणे यांनी बुधवारी दिवसभर भात बांधणी करून भातगंजी उभारली होती. मात्र सकाळी शेतात जाऊन पाहतात तर हत्तीने भातगंजी विस्कटून खाऊन तुडवून जमीनदोस्त केल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले. याची माहिती त्यांनी गावात दिली. त्यामुळे गावाजवळ हत्ती आल्याची बातमी सर्वत्र पसरली. त्याचबरोबर सायंकाळी चारच्या सुमारासच पुन्हा हत्ती परशराम आळवणे यांच्या उभ्या पिकात शिरल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले. आरडाओरडा करूनही हत्ती शिवारातून जंगलात न जाता भात पिकाचा शेतकऱ्यांच्या समोरच फडशा पाडून नुकसान केले आहे.
25 पोती भाताचे नुकसान
त्यामुळे या शेतकऱ्याचे जवळजवळ वीस ते पंचवीस पोती भाताचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या चार दिवसापासून या परिसरात हत्तीने ठाण मांडले आहे सुरुवातीचे दोन-तीन दिवस कामातगा जंगलात आणि आत्ता भालके जंगलात हत्ती वास्तव्यास असल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या हत्तीची चाहूल लागल्यापासून या भागात सगळीकडे भात कापण्या आणि मळणीला जोर आला आहे. हाता तोंडाला आलेले पीक सुरक्षित कसे घरी नेता येईल यासाठी येथील शेतकरी वर्ग परगावचे मजूर, पै-पाहुणे घेऊन सुगी कामाला लागले आहेत.
शेतकऱ्यात चिंता
वर्षभर जंगली प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी झोपडी घालून रात्रंदिवस संरक्षण करून सुरक्षित ठेवलेले पीक आता शेतकऱ्यांच्या समोरच हत्ती खात असल्याने शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. तरी वन विभागाने सदर हत्तीचा त्वरित बंदोबस्त करावा व त्याना भागातून हत्तीला पिटाळून लावून मोठ्या जंगलात हाकलाव ,व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी. अशी आग्रही मागणी होत आहे.









