पेडणे, बार्देश, काणकोण तालुक्याला जास्त फटका : अनेक ठिकाणी वीज तारा, खांबांचीही नुकसानी

प्रतिनिधी /पणजी
अवकाळी पावसाने सोमवारी रात्री उशिरापर्यंत घातलेल्या धुमाकुळामुळे राज्यात अनेक ठिकाणी पडझड झाली. सर्वाधिक फटका पेडणे, बार्देश आणि काणकोण तालुक्यांना बसला. पेडणे तालुक्यात मुसळधार पावसाबरोबरच वादळी वाऱयाने शेती, बागायतीचे तसेच आंब्यांचे प्रचंड नुकसान झाले. काही घरांवर झाडे पडल्याने घरांचेही नुकसान झाले. बार्देशमध्ये अनेक ठिकाणी झाडे कोसळली. ऐन पिकण्यास आलेल्या आंब्यांचे पीक हातोहात गेले तर काणकोण तालुक्यात जोरदार वादळी वाऱयाचा फटका बागायतदार कुळागारांना बसला शिवाय कित्येक घरांचेही नुकसान झाले. सर्वाधिक अडीच इंच पाऊस पेडणेत तर 2 इंच पाऊस हा सांखळीत पडला.
अवकाळी पावसाचा प्रकोप पुन्हा एकदा चालूच राहिला. सोमवारी पावसाबरोबरच जोरदार वादळी वारे देखील आले. त्यामुळे ऐन पिकण्यास आलेले आंबे झाडावरुन पडून शेतकऱयांचे नुकसान झाले. अनेक भागात कोकमचे पीकही हातातून गेले. काजू उत्पादन जे अगोदरच 50 टक्केपर्यंत खाली आलेले त्याचे या अवकाळी पावसाने आता त्यापलिकडे जाऊन नुकसान केले. त्यामुळे काजू बागायतदारदेखील अडचणीत आले आहेत. संपूर्ण गोव्याला सोमवारच्या तुफानी पाऊस आणि वादळाचा जोरदार फटका बसला. मौसमी फलोत्पादनावर ज्यांचा उदरनिर्वाह चालतो अशा बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले.
गेल्यावर्षी तौक्ते वादळाचा फटका
बागायतदारांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी गोव्यातील आंबा उत्पादनाला पावसाचा फटका बसला. गेल्यावर्षी 14 मे पासूनच पावसाला तौक्ते वादळाने सुरुवात झाली होती. त्यावेळी फळांचा ऐन मौसम बहरात असतानाच जोरदार पाऊस सुरु झाल्याने फळात पाणी गेले आणि आंबा उत्पादन वाया गेले. कोकमचे उत्पादनही गेले. गतवर्षी किमान काजूचे उत्पादन मिळाले होते. यावर्षी तेही हातातून निसटले.
शेती, बागायती, घरांचे नुकसान
पेडणे तालुक्यातील अनेक गावांमध्ये उन्हाळी पीक घेतले जाते. त्यात मिरची, कांदा, वाल, वांगी व इतरही काही पिके घेतली जातात. गेले काही दिवस मुसळधार पाऊस सायंकाळच्या दरम्यान पडत राहिल्याने हे पीकही गेले. सोमवारी पावसाने कहरच केला. पेडणे तालुक्यात अडीज ते तीन इंच एवढा मुसळधार पाऊस पडला आणि अनेक ठिकाणी पडझड झाली. त्यातून शेती, बागायती व घरांचेही नुकसान झाले.
वीज खात्याची मोठी हानी
प्राप्त माहितीनुसार, वीज खात्याची देखील कोटय़वधी रुपयांची हानी झाली आहे. राज्यातील अनेक भागातील ट्रान्सफॉर्मर निकामी झाले आहेत. वीज तारा तुटून पडल्या. काही भागात रात्री 1 नंतर पुन्हा वीज प्रवाह सुरु झाला तर काही भागात मंगळवारी दुपारी वीज पुरवठा सुरु झाला.










