खानापूर : करंबळ, जळगा, कौंदल परिसरातील टस्कर हत्तीला पकडून शिमोगा येथे हलविण्यात आले आहे. मात्र अवघ्या चार दिवसांनी कौंदल येथे पुन्हा चार हत्तांrचा कळप दाखल झाला असून मंगळवारी पहाटे कौंदल गावाजवळ असलेल्या नागेश भोसले यांच्या बागेतील केळी, नारळ, भाजीपाल्यासह इतर झाडांचे हत्तींच्या कळपाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे कौंदल, करंबळ परिसरातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. नुकताच एका टस्कर हत्तीचा बंदोबस्त करण्यात आला आहे.
करंबळ, कौंदल,जळगा परिसरातील शेतकऱ्यांनी तसेच वनखात्याने सुटकेचा नि:श्वास सोडला होता. त्यातच पुन्हा मंगळवारी चार हत्तींचा कळप कौंदल येथे दाखल झाला असल्याने शेतकऱ्यांत भीती पसरली आहे. हा हत्तीचा कळप पहाटे कौंदल येथील भोसले यांच्या शेतात नुकसान करून थेट हारुरी परिसरात दाखल झाला असून या ठिकाणी मंगळवारी सायंकाळी काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास पडला आहे. त्यामुळे हारुरी परिसरातील शेतकरीही चिंताग्रस्त आहेत. या परिसरात सध्या ऊस तोडणी सुरू आहे. हत्तींच्या कळपाकडून नुकसान झालेल्यांची माहिती वनखात्याला देण्यात आली आहे. मात्र वनखात्याने याची दखल घेतली नसल्याचे नागेश भोसले यांनी सांगितले.









