वनाधिकाऱयांचे दुर्लक्ष होत असल्याच्या शेतकऱयांच्या तक्रारी : बंदोबस्ताची मागणी
वार्ताहर /किणये
किणये शिवारात गव्यांच्या कळपाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शेतातील रताळी, ऊस, भात आदी पिके गवेरेडे फस्त करीत आहेत. यामुळे शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. वनखात्याच्या अधिकाऱयांचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी शेतकऱयांमधून होत आहेत.
किणये डोंगर पायथ्याशी शेतकऱयांच्या जमिनी आहेत. शेतामध्ये भात लागवड केली आहे. तसेच ऊसपीक व रताळी पिके आहेत. 6 ते 7 गव्यांचा हा कळप असून ते थेट शिवारात येऊन पिकांचे नुकसान करीत आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
या भागातील शेतकऱयांनी यंदा रताळी वेल लागवड दुपटीने केली आहे. रताळी वेलीला बऱयापैकी बहर येत आहे. मात्र, या कालावधीतच गवे येऊन रताळी वेल खात आहेत. रताळी वेलीला तयार होत असलेली रताळी फस्त करीत आहेत, अशी माहिती राजू देसाई यांनी दिली.
भात, रताळी पिकांचे मोठे नुकसान
किणये डोंगर पायथ्याशी शिवारात गवे प्रवेश करू नयेत यासाठी वनखात्याकडून तारेचे कुंपण करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱयांमधून करण्यात येत आहे. राजू मुतगेकर, रमेश लोहार, सागर डुकरे, मारुती पाटील आदी शेतकऱयांच्या भात व रताळी पिकांचे ते नुकसान करीत आहेत, अशी माहिती किणये येथील अनिल पाटील यांनी दिली.









