बियाणासाठीदेखील कडधान्याचे उत्पादन न झाल्याने शेतकरी हवालदिल
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या काही दिवसांपासून अचानकपणे वळिवाचा दमदार पाऊस कोसळला. यामुळे शेतकऱयांचे कडधान्य, जोंधळा आणि भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले. बेळगाव तालुक्मयातील बहुसंख्य गावांमधील शेतकऱयांच्या मसूर, वाटाणा, मोहरी आणि जोंधळा या पिकांचे नुकसान झाल्याने या सर्वच धान्यांचे दर आता गगनाला भिडले आहेत. महत्त्वाचे म्हणजे पुढील वषी पेरणी करण्यासाठी या धान्याची बियाणे राखीव ठेवण्यासाठी देखील शेतकऱयांना मिळाली नाहीत. यामुळे शेतकरी अक्षरशः तणावाखाली आला आहे.
यावषी अवकाळी पावसाने कडधान्य पेरणीच्या दरम्यानच मोठा दणका दिला. त्यामुळे कडधान्य पेरणी केलेली सर्वच पिके वाया गेली. त्यानंतर आता काढणीच्या वेळेला देखील वळिवाने दणका दिला. त्यामुळे आता शेतकऱयांना पुढील वषी कडधान्य पेरणी करायची की नाही? असा प्रश्न पडला आहे. मसूर, मोहरी, वाटाणा ही पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. खराब हवामान आणि पाऊस यामुळे ही पिके वाया गेली असून शेतकऱयाला मोठा फटका बसला आहे.
बेळगाव तालुक्मयातील येळ्ळूर, धामणे, मच्छे, पिरनवाडी, हलगा, बस्तवाड या परिसरातील मसूरला मोठी मागणी आहे. बेळगावची मसूर घेण्यासाठी इतर जिल्हय़ाबरोबरच परराज्यातील नागरिकदेखील नेहमीच धडपड करत असतात. बेळगाव ग्रामीण भागातील जनतादेखील आपल्या पाहुण्यांना मसूर देत असतात. मात्र, आता त्यांनादेखील मसूर देणे कठीण झाले आहे. कारण पेरणीसाठीच मसूर शिल्लक नाही. त्यामुळे पाहुण्यांना देणार तरी कुठून? असा प्रश्न सर्वांसमोरच उभा ठाकला आहे.
बेळगावच्या मसूरला एक वेगळी चव आहे. त्यामुळे मागणीदेखील अधिक आहे. याचबरोबर मोहरी, वाटाण्यालादेखील अधिक मागणी असते. पण यावषी उत्पादन शून्य झाल्यामुळे शेतकऱयांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. एक एकर जमिनीमध्ये पेरणी करण्यासाठी किमान 25 ते 30 किलो मसूरची आवश्यकता असते. मात्र, आता एकरी 2 ते 3 किलोही उत्पादन निघाले नाही. त्यामुळे पुढील वषी मसूर पेरणी करायची की नाही? बियाणे घेणेदेखील अवघड झाले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये बदलत्या हवामानामुळे कडधान्य पिकाला फटका बसत आहे. तरीदेखील शेतकरी मोठय़ा कष्टाने पेरणी करत होते. मागील वषीच 160 ते 180 रुपये किलोप्रमाणे मसूर खरेदी करून अनेक शेतकऱयांनी पेरणी होती. मात्र, यावषी एकाही शेतकऱयाकडे मसूर नसल्याने बियाणे कोठून मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या शहराच्या पूर्वभागातील काही गावांमध्ये अत्यंत थोडय़ा प्रमाणात मसूरचे उत्पादन झाले आहे. काही शेतकरी 200 रुपये प्रतिकिलो दराने मसूर देण्यास तयार असले तरी ते बियाणे घेऊन पेरणे कठीण जाणार आहे.
यावषी कडधान्य पिकाला सर्वात अधिक फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल बनला आहे. अशीच अवस्था राहिल्यास भविष्यात बेळगाव तालुक्मयातील कडधान्य पीक नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे. एकूणच अवकाळी आणि वळीव पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱयांतून व्यक्त होत आहेत.









