भात शेतीमध्येही अक्षरशः उच्छाद मांडला
ओटवणे प्रतिनिधी
सह्याद्री पट्ट्यात गव्या रेड्यांच्या कळपाचा हाता तोंडाशी आलेल्या भात शेतीत उच्छाद सुरूच असुन रविवारी मध्यरात्री गवारेड्यांच्या कळपाने सांगेली खळणेवाडीत कुटजी सावंत यांच्या काजू बागायतीला लक्ष करीत २५ काजुंच्या कलमांचे नुकसान केले. यात कुटजी सावंत यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.
सध्या सह्याद्री पट्ट्यात गवा रेड्यांचे कळप अनेक ठिकाणी हातातोंडाशी आलेल्या भात शेतीमध्ये अक्षरशः उच्छाद मांडून भात शेतीचे अतोनात नुकसान करीत असतात. आता तर या गवारेड्यांच्या कळपाने काजू बागायतीलाही लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत आहे. महाकाय गवे रेडे आपले अंग आणि शिंगे या काजूच्या कलमांना जोरदार घासत काजूच्या फांद्या जमीन दोस्त करतात तसेच काजू कलमांचे खोडही कमकुवत करतात.
यापूर्वीही या भागात गवा रेड्यांच्या आक्रमक कळपांनी शेतातील शेतमळे उध्वस्त केले असून या शेतमाळ्यावर राखण करणाऱ्या शेतकऱ्यालाही भर मध्यरात्री नजर कैदेत ठेवले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान याबाबत देवसु वन परीमंडळाचे लक्ष वेधले असता वन कर्मचाऱ्यांनी या काजू बागायतीच्या नुकसानीची पाहणी केली. गवा रेड्यांच्या या बंदोबस्ताबाबत वनखात्याच्या वरिष्ठ विभागाने ठोस उपायोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.









