रेशन दुकानदारांना तुटवडा : अन्न-नागरी पुरवठा खात्याचे दुर्लक्ष, लाभार्थ्यांना फटका
बेळगाव : अन्नभाग्य योजनेंतर्गत दारिद्र्या रेषेखालील लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या तांदळाची मोठ्या प्रमाणात नासाडी होऊ लागली आहे. त्यामुळे रेशन दुकानदार आणि लाभार्थ्यांना फटका बसू लागला आहे. रेशन दुकानदारांना मासिक धान्यसाठा कमी येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. परिणामी रेशन दुकानदारांकडून लाभार्थ्यांनाही एक-दोन किलो तांदूळ कमी वितरित केला जात आहे. या प्रकारामुळे काही वेळा लाभार्थी आणि दुकानदारांमध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवू लागले आहेत. अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष पुरवून तांदळाची नासाडी थांबवावी, अशी मागणीही होत आहे. अन्नभाग्य योजनेंतर्गत दारिद्र्या रेषेखालील लाभार्थ्यांना मासिक तांदूळ वितरित केला जातो. रेल्वेमार्फत येणाऱ्या तांदळाचा साठा प्रथमत: फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) च्या गोदामात केला जातो. तेथून पुढे तो जिल्ह्यातील कर्नाटक फूड कॉर्पोरेशन (केएफसी) गोदामाकडे पाठविला जातो.
या वाहतुकीदरम्यान ट्रकमधून मोठ्या प्रमाणात तांदूळ रस्त्यावर पडून त्याची नासाडी होऊ लागली आहे. वाहतुकीदरम्यान ट्रकमधून तांदूळ पडून वाया जात असल्याने रेशन दुकानदारांना तूट येऊ लागली आहे. त्यामुळे रेशनचे वितरण करताना दुकानदारांसमोर समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. याबाबत रेशन दुकानदारांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने तक्रारी केल्या आहेत. मात्र, अधिकारी याकडे कानाडोळा करून सुस्त असल्याचे दिसत आहे. वाहतुकीदरम्यान रस्त्यावर तांदळाची नासाडी होण्याचे प्रकार सर्वत्र पाहावयास मिळत आहेत. पोत्यांमधून हा तांदूळ रस्त्यावरच पडून वाया जात आहे. ट्रकमध्ये तांदूळ भरताना आणि उतरवतानाही मोठ्या प्रमाणात नासाडी होऊ लागली आहे. परिणामी रेशन दुकानदारांना तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रेशन दुकानदार लाभार्थ्यांना तांदूळ कमी देऊ लागले आहेत. एक-दोन किलो तांदूळ कमी देत असल्याने लाभार्थ्यांतून संताप व्यक्त होत आहे. काही वेळा रेशन वितरणावरून रेशन दुकानदार आणि लाभार्थ्यांमध्ये वाद होऊ लागले आहेत.
दुकानदारांसमोर अडचणी…
रेशनच्या वाहतुकीदरम्यान धान्याची नासाडी होऊ लागली आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांना धान्याचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. याबाबत अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मात्र, अधिकाऱ्यांचे याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. धान्य वितरणावेळी रेशन दुकानदारांसमोर अडचणी निर्माण होत आहेत.
– राजशेखर तळवार, (राज्य उपाध्यक्ष, रेशन दुकान मालक संघटना)









