न्याय मिळवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी : नुकसानभरपाई तातडीने मिळावी तसेच वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची सूचना करण्याची अपेक्षा
खानापूर : खानापूर तालुक्यातील शेतकरी वर्ग सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे मोठ्या संकटात सापडला आहे. अवेळी पडणारा पाऊस, बदलते हवामान, त्यातही नेहमीप्रमाणे शेतीसाठी चाललेली धडपड सुरू असली तरी दुसरीकडे उभ्या पिकावर वन्यप्राण्यांकडून नेहमीच चाललेले आक्रमण पाहता शेतकरी आता अनेक अडचणीच्या चक्रव्युहात सापडला आहे. वन्यप्राणी आता जंगलाऐवजी शेतावर येत आहेत. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी बेळगाव येथील सुरू असलेल्या अधिवेशनात याबाबत आवाज उठवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
खानापूर तालुक्याच्या जंगल भागात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या संख्येने आहे. पण पूर्वी नुकसान करणाऱ्या वन्यप्राण्यांवर बंदूक चालवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना होता. यासाठी शेतकऱ्यांना पीक संरक्षणार्थ बंदूक परवानेदेखील देण्यात आले. एखाद्यावेळी वन्यप्राणी शेतात घुसले तरी शेतकरी बंदुकीचा बार उडवत होते. यामुळे वन्यप्राण्यांचे शेतवडीतील पिकावर ताव मारण्याचे धाडस होत नव्हते. पण केंद्र शासनाने वन्यप्राणी संरक्षण कायदा अंमलात आणल्याने पीक संरक्षणातदेखील वन्यप्राण्यावर बंदूक चालवण्याचा असलेला अधिकार काढून घेण्यात आला. यामुळे वन्यप्राण्यांना शेतीवडीतील पिकाचे आयते कुरण मिळाले आहे. हत्ती, रानडुक्कर, गवे, मोर, माकडे, चित्तळ, भेकड यासारख्या प्राण्यांची संख्या तर मोठ्या प्रमाणात वाढली असून रानडुक्कर आणि गव्यांच्या कळपानी तर पीक नुकसानीचा सपाटाच चालवला आहे. त्यातच आता हत्तीनी आपला मोर्चा खानापूर तालुक्यातील शेतात वळवला आहे. अवघ्या महिन्याभरातच हत्तीनी नागरगाळी, लोंढा, गुंजी विभागातील अनेक गावात धुडगूस घातला असून लाखो रु. चे शेतकऱ्यांचे नुकसान हत्तीकडून होत आहे.
याबाबत वनखात्याकडून या हत्तीना पुन्हा वन्य विभागात पाठवण्यासाठी कोणतीच उपाययोजना आखण्यात येत नसून शेतकरी आणि वनखातेही हतबल झाले आहेत. हत्तीना वन्य विभागात पाठवण्यासाठी प्रशिक्षीत वन कर्मचारी आवश्यक आहेत. यासाठी योग्य ती उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा येत्या काही दिवसात हत्तींच्या हल्ल्यात जीवितहानी होण्याचाही धोका निर्माण झाला आहे.
तालुक्यात सुगीचा हंगाम सुरू आहे. अशातच गुंजी, शिरोली परिसरातील माणिकवाडी, नायकोल, शिंदोळी, सावरगाळी, तिवोलीवाडा, तिवोली, संगरगाळी, आंबेवाडी, किरावळा, भालके, डेंगरगाव, तेरेगाळी, नेरसा, अशोकनगर तसेच मणतुर्गा, असोगा, मन्सापूर, भोसगाळी, हाऊरी, शेडेगाळी, गंगवाळी, ढोकेगाळी, परिसरात रानडुकर तसेच गवे ठाण मांडून बसले आहेत. दिवसभर मोर, माकड यासारखे वन्यप्राणी भात, शेंगा, ऊस यासारख्या पिकावर आपला ताबा घेत आहेत. तर सायंकाळनंतर हत्ती, गवे आणि रानडुक्करानी तर शेतीवाडीत घुसून अक्षरश: हैदोस घातला आहे. पूर्वी या भागात शेतकरी केवळ भातच नव्हे तर नाचणा, भुईमूग व इतर बरीच पिके घेत होते. पण आता वन्यप्राण्याना कंटाळून शेतकऱ्यांनी केवळ पावसाळी भात पिकावरच आपली मदार ठेवली आहे. पण उभे भातपीकही वन्यप्राण्यांकडून फस्त केले जात आहे. वनखात्याकडून नुकसानभरपाई देखील कवडीमोलाची आणि तीही मिळवण्यासाठी सहा महिने तर वर्षभर वाट पहावी लागते. वनखात्याकडून नुकसानभरपाई मिळावी आणि वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी योग्य ती उपाययोजना आखावी, यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी बेळगाव अधिवेशनात मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांना माहिती देवून तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
वन्यप्राणी संरक्षण कायद्यामुळे शेतकरी संकटात
ब्रिटिश काळात पीक रक्षणासाठी रानडुक्करे किंवा गवीरेड्यांसारख्या प्राण्यांची शिकार करून त्याची शेपटी वनखात्याकडे दाखल केल्यास त्या शेतकऱ्याला एक काडतूस दिली जात होती. पण आता वन्यप्राणी संरक्षण कायद्याची अत्यंत कडकरित्या अंमलबजावणी केली जात आहे. यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यादेखतच वन्यप्राण्यांकडून उभ्या पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना आता पीक काढावे कुणासाठी पोटासाठी की, वन्यप्राण्यांसाठी? असे म्हणण्याची वेळ आली आहे. केवळ वन्यप्राण्याकडून होणाऱ्या नुकसानीमुळे तालुक्यातील पीक क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला असून त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. यामुळे आता भाताबरोबरच आता तालुक्यातील उसाचे उत्पादनही बरेच घटले आहे. आता हे वन्यप्राणी अगदी गावातील रस्त्यांवर येऊन पोहचले आहेत.









