वार्ताहर/नंदगड
खैरवाड (ता. खानापूर) येथे जुन्या घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले आहे. शिवाय त्याखाली संसारोपयोगी साहित्यासह गणेश चतुर्थीनिमित्त पूजलेल्या गणपती मूर्तीचेही मोठे नुकसान झाले आहे. खैरवाड येथे आपल्या वडिलोपार्जित घरात संतोष पाटील, दत्तू पाटील, मारुती पाटील, परसू पाटील, अरुण पाटील, तुकाराम पाटील आदींनी कुळघरात गणेश पुजवला आहे. पावसामुळे या घरातील भिंतीवर मोठ्या प्रमाणात पाणी झिरपले. परिणामी भिंत ओली झाल्याने शनिवारी दुपारी 12.30 वाजता कोसळली. दरम्यान मोठा आवाज झाला. तब्बल पन्नास फूट लांब भिंत असल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य, शेती अवजारे व अन्य काही किमती वस्तू भिंतीच्या मातीखाली सापडल्या. त्यामुळे संबंधितांचे मोठे नुकसान झाले आहे. घर उघड्यावर पडले आहे. दरम्यान घरात कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही. शासनाने संबंधितांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.









