निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पाईप पडले उघडय़ावर : पाणी शेतात शिरल्याने शेतकऱयांचे मोठे नुकसान, तीव्र संताप
प्रतिनिधी /खानापूर
नंदगड गावाजवळ असलेल्या डॅमच्या उजव्या व डाव्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम गेल्या दोन महिन्यापूर्वी करण्यात आले होते. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे केलेल्या कामाचा भराव वाहून गेल्यामुळे व पाईप पूर्णपणे उघडय़ावर पडून पाणी शेतात आल्याने शेतकऱयांचे नुकसान होत आहे. या कामासाठी लाखो रु. चा निधी खर्च केल्याचे तेथील शेतकऱयांनी सांगितले. मात्र दुरुस्तीच्या नावाखाली पाईप घालून माती ओढण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात हा भराव वाहून जाऊन पाईप उघडय़ावर पडले आहेत. त्यामुळे या भागातील शेतीचे नुकसान होत आहे. शेतकरीवर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नंदगड परिसरातील दुर्गादेवी डोंगराच्या खाली नैसर्गिक परिस्थितीचा विचार करून या ठिकाणी डॅम बांधण्यात आला होता. या डॅमसाठी उजवा, डावा असे दोन कालवे तयार करण्यात आले होते. दोन्ही कालव्यांद्वारे चार कि. मी. परिसरातील शेतीला पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे कसबा नंदगड, चन्नेवाडी, सागरे, नजिनकोंडल, भुत्तेवाडी आदी परिसरातील 1500 एकर शेतीला पाणीपुरवठा करण्यात येतो. यामुळे शेतकऱयांना याचा लाभ होत होता. दोन्ही कालवे निकामी झाल्याने शेतकऱयांना होत असलेला पाणीपुरवठा बंद झाला होता. या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी 1 कोटीचा निधी मंजूर झाला होता. मात्र याचे काम सुरू झाले नाही. गेल्या चार महिन्यापूर्वी लघुपाटबंधारे विभागाच्या माध्यमातून या कालव्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात आली. काही ठिकाणी नवीन पाईप घालण्यात आले. पाईप घालताना या पाईपांची जोडणी योग्यरित्या केली गेली नाही. या पाईपलाईनवर माती ओढून झाकून टाकण्यात आली. मात्र झालेल्या पावसामुळे संपूर्ण माती वाहून जाऊन सर्व पाईपलाईन उघडय़ावर पडली असून जोडलेले पाईप सुटलेले आहेत. त्यामुळे धरणातील पाणी या भागातील शेतात मोठय़ा प्रमाणात येत असल्याने शेतकऱयांचे प्रचंड नुकसान होत आहे.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
याबाबत लघुपाटबंधारे खात्याच्या अधिकाऱयाशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत जबाबदारी झटकून उत्तर देण्यास टाळाटाळ केली आहे. यामुळे लाखो रु. चा निधी वाया गेल्याने शेतकऱयांतून संताप व्यक्त होत आहे. या झालेल्या दुरुस्तीच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोन्ही कालव्यांच्या दुरुस्तीचे काम करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱयांतून करण्यात येत आहे.









