अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हद्द निश्चित-पूजन कार्यक्रम : बैठकीत शेतकऱ्यांबरोबर चर्चा
वार्ताहर/उचगाव
बसुर्ते येथील धरणाच्या कामाला शासनाने मंजुरी दिली असून, या धरणाच्या कामाला प्रारंभ होणार आहे. या धरणाची निर्मिती करण्यासाठी धरणाची हद्द निश्चित करण्याचा आणि पूजन असा संयुक्त कार्यक्रम रविवारी बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम यांच्या नेतृत्वाखाली अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. बसुर्ते गावालगत पूर्वीचे जुने धरण होते. याच धरणाची लांबी, रुंदी वाढवून छोट्या धरणाचे रूपांतर आता मोठ्या धरणात करण्यात येणार आहे. या धरणाचे पाणी या भागातील हजारो एकर जमिनीला उपयुक्त ठरणार आहे. या संदर्भात शनिवारी राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला संबंधित खात्याचे अनेक अधिकारी आणि बसुर्ते गावातील ज्यांची जमीन या धरणामध्ये जाणार आहे, असे सर्व शेतकरी उपस्थित होते.
या धरणाच्या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा करून सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. या धरण निर्मितीच्या कामाला आता लवकर सुरुवात होणार आहे. या संदर्भात रविवार दि. 20 एप्रिल रोजी शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या धरणाची हद्द निश्चित करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम, नेताजी बेनके, नारायण गडकरी, दीपक गडकरी, संजय गोजगेकर, चाळू घुमटे यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. रविवारी हद्द निश्चित केली असून या कामाचा शुभारंभ होणार आहे. थोड्याच दिवसात या धरणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम करणार असल्याची माहिती अधिकारी वर्गाकडून देण्यात आली आहे.









