फतेहगड साहिब येथील महापंचायतमध्ये घोषणा : शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात
वृत्तसंस्था/ फतेहगड साहिब
पंजाबच्या शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकऱ्यांनी ठोकलेले तंबू हटविण्यात आल्याच्या विरोधात राज्यात शेतकरी महापंचायतींचे आयोजन करण्यात येत आहे. याचनुसार फतेहगड साहिबमध्ये महापंचायत पार पडली असून यात भारतीय किसान युनियन एकता सिद्धूपूरचे प्रदेशाध्यक्ष जगजीत सिंह डल्लेवाल यांनीही भाग घेतला. यावेळी डल्लेवाल यांनी स्वत:चे 130 दिवसांचे उपोषण समाप्त करण्याची घोषणा केली आहे.
डल्लेवाल यांनी मागील वर्षी 26 नोव्हेंबर रोजी आंदोलक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरून उपोषण सुरू केले होते. शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभावाची कायदेशीर हमी देण्याची मागणी त्यांनी केली होती. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी डल्लेवाल यांना उपोषण समाप्त करण्याचे आवाहन केले होते.
सरकारने फसविले
एकीकडे सरकार आम्हाला बैठकीसाठी बोलावत आहे, दुसरीकडे रात्री आमचे तंबू उखडून टाकत आहे. सरकारने शेतकऱ्यांना फसविले आहे. सरकारच्या जुलूमाच्या विरोधात महापंचायत होत असून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही तोवर आंदोलन जारी राहणार असल्याचे शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांनी मला आमरण उपोषण समाप्त करण्याचे आवाहन केले होते. आंदोलनाची धुरा सांभाळल्याबद्दल मी शेतकऱ्यांचा ऋणी आहे. शेतकऱ्यांच्या भावनांचा मी सन्मान करतो असे डल्लेवाल यांनी नमूद केले आहे.
आंदोलक शेतकऱ्यांचे नेतृत्व
डल्लेवाल हे संयुक्त किसान मोर्चा (बिगर राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या संयुक्त मंचाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्याकरता मागील वर्षी आमरण उपोषण सुरू केले होते. जानेवारी महिन्यात केंद्र सरकारने शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रित केल्यावर डल्लेवाल यांनी खनौरी येथे वैद्यकीय मदत घेण्यास सुरुवात केली होती, परंतु स्वत:चे उपोषण समाप्त केले नव्हते.
केंद्र सरकारचे प्रयत्न
तर केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी शनिवारी डल्लेवाल यांना उपोषण समाप्त करण्याचे आवाहन केले होते. याचबरोबर केंद्रीय मंत्री बिट्टू यांनीही डल्लेवाल यांना उपोषण समाप्त करण्याचे आवाहन केले होते. डल्लेवाल यांचे जीवन पंजाबच्या लोकांसाठी मूल्यवान आहे, कारण शेतकरी आणि शेतमजुरांच्या संघर्षासाठी त्यांच्या नेतृत्वाची आम्हाला नेहमी गरज राहणार आहे. भाजपचे सर्व मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांनी संसदेच्या अधिवेशनादरम्यान डल्लेवाल यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली होती. डल्लेवाल यांनी उपोषण समाप्त करणे आणि केंद्र सरकारसोबत चर्चेसाठी पुढे यावे असे बिट्टू यांनी म्हटले होते.









