शेतकरी आंदोलकांची आज महत्त्वपूर्ण बैठक : मंगळवारी दिल्लीकडे कूच करणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शेतकरी नेते जगजीतसिंग डल्लेवाल यांचे उपोषण 53 व्या दिवशीही सुरू राहिले. आता त्यांची प्रकृती दिवसेंदिवस चिंताजनक होत असून उपोषण सुरू केल्यापासून त्यांचे वजन तब्बल 20 किलोने घटले आहे. उपोषण सुरू करताना त्यांचे वजन 86 किलो होते पण आता त्यांचे वजन 66 किलोपर्यंत कमी झाले आहे.
एकीकडे डल्लेवाल यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच आता शेतकरी आंदोलक दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत. किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आता मंगळवार, 21 जानेवारी रोजी शंभू बॉर्डर ते दिल्ली असा पायी मोर्चा काढतील. या मार्गक्रमणापूर्वी आज शनिवारी शेतकरी आंदोलक नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.
दिल्ल्लीकडे जाणाऱ्या निदर्शकांच्या गटात 101 आंदोलनकारी शेतकऱ्यांचा समावेश केला जाईल, असे शेतकरी नेते सर्वन सिंह पंढेर यांनी सांगितले. यापूर्वी शेतकरी संघटनांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात तीनदा दिल्लीकडे पायी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रत्येक वेळी हरियाणा पोलिसांनी त्यांना शंभू सीमेवर उभारलेल्या बॅरिकेड्सच्या पलीकडे जाऊ दिले नव्हते. हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांवरून पंजाब आणि हरियाणाचे काही शेतकरी मागील अनेक महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. या आंदोलकांनी पुन्हा एकदा दिल्लीच्या दिशेने कूच करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी 2021 मध्ये कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांकडून 26 जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान निदर्शकांनी पोलीस बॅरिकेडिंग तोडून दिल्लीत प्रवेश केला होता.









