दाम्पत्याला बेंगळूरमध्ये अटक : अन्य तिघांचा शोध सुरू
वृत्तसंस्था/ बेंगळूर, चेन्नई
देशभरात टोमॅटोचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. पेट्रोलपेक्षाही महाग झालेला टोमॅटो विकत घेताना ऐन पावसाळ्यात सर्वसामान्यांना घाम फुटत आहे. महागड्या टोमॅटोसाठी चोरी-दरोडे, खून अशा भीषण घटना घडत आहेत. कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेशसह देशभरात टोमॅटो चोरीची अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. याचदरम्यान ‘बंटी और बबली’ने अडीच हजार किलो टोमॅटोंवर डल्ला मारण्याची घटना नुकतीच उघड झाली. संबंधित दाम्पत्याला शनिवारी बेंगळूरमधून अटक करण्यात आली.
तामिळनाडूतील एका जोडप्याला बेंगळूमध्ये 2.5 टन टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक अपहरण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेल्लोर येथील रहिवासी असलेले हे जोडपे महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचे सदस्य आहेत. त्यांनी 8 जुलै रोजी चित्रदुर्ग जिह्यातील चिक्काजाला येथे हिरीयुर येथील मल्लेश या शेतकऱ्याला थांबवले आणि ट्रकने आपल्या कारला धडक दिल्याचे सांगून त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. मल्लेशने पैसे देण्यास नकार दिल्याने दाम्पत्याने त्याला मारहाण केली. त्याला ट्रकमधून फेकून दिले आणि अडीच लाख ऊपये किमतीच्या अडीच टन टोमॅटोने भरलेला ट्रक घेऊन पलायन केले. शेतकऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी या टोळीचा माग काढत शनिवारी भास्कर (28) आणि त्याची पत्नी सिंधुजा (26) यांना अटक केली. मात्र, त्यांचे इतर तीन साथीदार अद्याप फरार आहेत, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी रॉकी, कुमार आणि महेश यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्याकडे 2.5 टन टोमॅटो होते. लुटारूंच्या एका टोळीने महामार्गावर आपल्या गाडीला अपघात झाल्याचे भासवत हे टोमॅटो लुटले. या टोळीत एका जोडप्याचाही समावेश असून पोलिसांनी त्यांना जेरबंद केले आहे. त्यांची सध्या कसून चौकशी सुरू असून लूटमार केलेल्या टोमॅटोची चेन्नईत विक्री केल्याचे त्यांनी कबूल केले आहे.
‘अपघाताचे नाटक’
तामिळनाडूतील वेल्लोर येथील लुटारूंच्या टोळक्याने लूटमार करण्यासाठी मोठे कारस्थान रचले. एका दाम्पत्याची कार टोमॅटो वाहतूक करणाऱ्या ट्रकला धडकल्याचे भासवण्यात आले. त्यानंतर नुकसानभरपाई म्हणून 10 हजार ऊपयांची मागणी करण्यात आली. शेतकऱ्याने पैसे देण्यास नकार दिल्याने या टोळीने अडीच लाख ऊपये किमतीचे अडीच टन टोमॅटोचा ट्रक घेऊन पलायन केले. तत्पूर्वी मल्लेश या शेतकऱ्याशी त्यांचे जोरदार भांडण झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्याच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 379 (चोरी) आणि 390 (दरोडा) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.