साहित्याची परस्पर विक्री केल्याने अभाविपच्या मदतीने आंदोलन, भोजनाचा दर्जाही सुमार
बेळगाव : गणेशपूर येथील डॉ. देवराज अरस मागासवर्गीय वसतीगृहात निकृष्ट प्रतीचा आहार दिला जात आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून आलेल्या किटमधील साहित्याची परस्पर विक्री करण्यात आल्याने शुक्रवारी रात्री अभाविपच्यावतीने वसतीगृहासमोर आंदोलन करण्यात आले. रात्री 1 वाजेपर्यंत अभाविपचे कार्यकर्ते व वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश वसतीगृह व्यवस्थापनाच्या तालुकाधिकाऱ्यांनी दिले. शहरात शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी येतात. त्यांना उच्चशिक्षण घेता यावे, यासाठी सवलतीच्या दरात वसतीगृह उपलब्ध करून देण्यात आले आहे. गणेशपूर येथील ज्योतीनगर भागात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह आहे. या ठिकाणी वॉर्डन व अन्य एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु, विद्यार्थ्यांना निकृष्ट प्रतीचा आहार व खाद्यपदार्थ दिले जात असल्याने विद्यार्थ्यांकडून तक्रारी दाखल करण्यात येत होत्या.
तक्रारींची दखल घेऊन अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी वसतीगृह गाठले. काही कार्यकर्त्यांनी तेथील आहाराची चव चाखली असता तो अतिशय निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात असल्याचे समोर आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना दैनंदिन वापरासाठी साबण, टूथपेस्ट यासह इतर साहित्याचे किट देण्यात येते. परंतु, हे किट विद्यार्थ्यांना न देता परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. किटच्या पॅकिंगचे बॉक्स एका ठिकाणी सापडले असून विद्यार्थ्यांनी याबाबत संताप व्यक्त केला. जोवर संबंधितांवर कारवाई होत नाही, तोवर आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. रात्री 1 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मारला. अखेर अल्पसंख्याक विभागाचे तालुकाधिकारी के. बी. देवाप्पगोळ यांनी वसतीगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतरच विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी अभाविपचे पदाधिकारी रोहित हुमणाबादीमठ, शहर सचिव सचिन हिरेमठ, सुरेश एम., प्रीतम हुपरी, सन्नी देसाई यासह इतर उपस्थित होते.









