मिरज तालुक्यातील बेडग गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने होणारी स्वागत कमान पाडल्या प्रकरणी आणि संबंधितावर कारवाई न केल्याचा निषेध म्हणून गावातील दलित कुटुंबांनी गाव सोडून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून असंख्य महिला डोक्यावर गाठोडे घेऊन मिरज शहराच्या दिशेने चालू लागल्या आहेत. दलित ग्रामस्थानी बेडग ते मंत्रालय असा लॉंग मार्च करणार आहेत अशी माहिती त्यांचे नेतृत्व करणाऱ्या महेशकुमार कांबळे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिरजेचे आमदार आणि पालकमंत्री सुरेश खाडे यांचे मंत्री पद काढून घेण्याची मागणी यावेळी महेशकुमार कांबळे यांनी केली आहे. तर जिल्ह्यातील खासदार संजय पाटील, पालकमंत्री सुरेश खाडे हे भाजपचे असून प्रशासनावर दबाव टाकून आंबेडकरी समाज बांधवांवर अन्याय करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
प्रशासनाकडे अनेक स्मरणपत्रे, आंदोलने करून प्रशासनाने दखल घेतली नाही. आमरण उपोषण सुरू असताना जनसुराज्य पक्षाचे समित कदम वगळता कोणत्याच राजकीय पक्षाने साधी भेट ही दिली नसल्याचा आरोप कांबळे यांनी केला. तर आज पासून बेडग ते मंत्रालयपर्यंत लॉंग मार्च काढणार असून बेडग गावातील आंबेडकरी समाजातील समाज बांधव संसार साहित्य, मुले-बाळे, वृद्ध, तरुण, महिला खाण्यापिण्याचे साहित्य, गुरे ढोरे घेऊन मंत्रालयाच्या दिशेने निघत असल्याची माहिती ही त्यांनी दिली.