ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शेळी आणि कबुतर चोरल्याच्या संशयातून चार दलित तरुणांना झाडाला उलटं टांगून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार नगर जिल्ह्यात घडला. या चारही तरुणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे शेळी आणि कबुतर चोरल्याच्या संशयावरून शुभम, कुणाल, ओम (संपूर्ण नाव समजू शकले नाही) यांच्यासह अन्य एकाला काल दिवसभर झाडाला उलटं लटकावण्यात आले. तसेच त्यांना अमानुष मारहाण करत त्यांच्या चेहऱ्यावर लघुशंका करण्यात आली. मारहाणीत तरुण जखमी झाले असून, त्यांच्यावर श्रीरामपूर येथील कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या तरुणांसोबत अमानवीय कृत्य झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली असून, तरुणांच्या पालकांनी आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.








