खानापूर : खानापूर तालुका दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद संघटनेच्यावतीने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून शासकीय जमिनीचा लाभ कीती शेतकऱ्यांना देण्यात आला, याची माहिती निवेदन देवून मागविण्यात आली. उपतहसीलदार राकेश बुवा यांनी निवेदनाचा स्वीकार केला आणि आवश्यक माहिती देण्याचे आश्वासन दिले. राज्यातील शेतकरी वर्षानुवर्षे सरकारी पड जमिनीवर तसेच वनजमिनीत शेती करून आपली उपजीविका करत आहेत. ही जमीन आपल्या नावे मंजूर करण्यात यावी, यासाठी शासनाने निर्देश केलेल्या फॉर्म नंबर 50,53, 57 अन्वये शासनाकडून अर्ज करण्यात आले आहे. मात्र या अर्जाचा योग्यप्रकारे छाननी न करता शेतकरी कसत असलेल्या जमिनीबाबत निर्णय घेतलेला नाही.
तसेच अधिकाऱ्यांकडून जमिनीची वेगळ्या प्रकारे विल्हेवाट लावण्यात येत आहे. यासाठी दलित संघर्ष समितीच्यावतीने राज्यभर एकाच दिवशी आंदोलन करून किती शेतकऱ्यांना या जमिनीचा लाभ मिळाला, याची माहिती मिळवण्यासाठी तालुका, जिल्हा तसेच राज्यात निवेदन देण्याचे आंदोलन हाती घेण्यात आले आहे. याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खानापूर दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद यांनीही खानापूर येथे मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवाजी मादार, डी. एल. भंडारकर, राम मादार, संजू मादार, जयश्री नाईक, कार्तीक मादार, दयानंद रजपूत यासह दलित संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.









