आरोपींनी ‘ओम’ टॅटू अॅसिडने जाळल्याचा आरोप
वृत्तसंस्था/लखनौ
उत्तर प्रदेशातील मोरादाबाद जिल्ह्यात एका अल्पवयीन दलित युवतीचे अपहरण करुन तिच्यावर अनेक दिवस बलात्कार करण्यात आल्याची क्रूर घटना घडली आहे. आरोपींनी तिच्या हातावरचा ‘ओम’ अक्षरे असणारा टॅटूही अॅसिड टाकून जाळल्याचा आरोप पिडितेने आणि तिच्या वडीलांनी केला आहे. या प्रकरणी मोरादाबाद पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून पुढील तपास केला जात आहे. या युवतीचा मोठ्या प्रमाणात छळ केल्याचाही आरोप करण्यात येत आहे.
सलमान, झुबेर, रशीद आणि अरीफ अशी या चार आरोपींची नावे असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता, बालक संरक्षण कायदा (पोक्सो) आणि अन्य कायद्यांच्या आधारे आरोप नोंद करण्यात आले आहेत. आरोपींनी या युवतीला जबरदस्तीने मांस खाऊ घातले असाही आरोप या अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. 2 जानेवारी 2025 ला ही युवती एका शिंप्याच्या दुकानात गेली असताना तिचे या चार आरोपींनी अपहरण केले. तिला कारमधून अन्यत्र नेण्यात आले आणि एका खोलीत डांबून तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला, अशी तक्रार नातेवाईकांनी सादर केली आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून अन्य आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके पाठविण्यात आली आहेत. अटक केलेल्या आरोपीकडून इतर आरोपींची माहिती काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
अॅसिडचा हल्ला
ही युवती आरोपींच्या ताब्यात असताना तिच्यावर अॅसिड टाकून तिला गंभीर जखमी करण्यात आले असा आरोप आहे. तिच्या हातावर ओम अशी अक्षरे असलेला टॅटू होता. तो अॅसिड टाकून जाळण्यात आला. तसेच तिला विद्रूप करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दलित संरक्षण कायद्याखालीही गुन्हा
सर्व चार आरोपींच्या विरोधात अन्य कायद्यांप्रमाणेच दलित संरक्षण कायद्याच्या अंतर्गतही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. इतर तीन आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसून, त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती संजय कुमार पांचाल या तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेमुळे मोरादाबाद भागात लोकांमध्ये संतापाची लाट उसळली असून सर्व आरोपींना त्वरित अटक करून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.









