वारणनगर / प्रतिनिधी
वाठार बोरपाडळे राज्यमार्गावरील कोडोली ता. पन्हाळा येथे नरसिंह मंदिराजवळ असणारे धोकादायक वळण हटवून धोकादायक पुलाचे तात्काळ रुंदीकरण करा या मागणीसाठी भारतीय दलित महासंघाच्या वतीने आज सोमवार दि.२४ रोजी सकाळी साडेअकरा वाजता रास्ता रोको करण्यात आला यामुळे या मार्गावरील काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
वाठार ते बोरपाडळे या राज्य मार्गाचे दोन पदरी रुंदीकरण झालेले आहे तथापि याच मार्गावर असणाऱ्या नरसिंह मंदिराला लागून असणारे धोकादायक वळण काढून पुलाचे रुंदीकरण आजवर झालेले नाही या मार्गाची निर्मिती होऊन शंभर वर्षापेक्षा अधिक काळ झाला तरी देखील बदलत्या परिस्थितीनुसार रस्त्याचे रुंदीकरण झाले तरी पुलाच्या रुंदीकरणाचे किंवा धोकादायक वळण काढण्याचे कोणतेही प्रयत्न आजवर सार्वजनिक बांधकाम विभागाने केले नसल्यामुळे जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.
वाठार बोरपाडळे राज्य मार्गावर कोकण रत्नागिरीकडे जाणारी येणारी मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे धोकादायक वळणावरच नरसिंह पूल अरुंद असल्याने या ठिकाणी गतीने येणाऱ्या वाहनावर चालकाला तात्काळ नियंत्रण मिळवता येत नाही त्यामुळे पुलावरून वाहने थेट ओढ्याच्या पात्रात कोसळतात असे अपघात वारंवार घडत असल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहेत प्रवाशांना गंभीर दुखापती होत आहेत या संदर्भाने कोडोली पोलीस दलाने देखील बांधकाम विभागाला वारंवार अहवाल पाठवला आहे तसेच कोडोली ग्रामपंचायत, स्थानिक नागरिक,संघटना व लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून देखील धोकादायक वळण हटवावे नवीन पुलाचे रुंदीकरणासह काम व्हावे अशी मागणी सातत्याने होत आली आहे याकडे देखील बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे.
धोकादायक वळण काढून पुलाचे रुंदीकरण तात्काळ करा या मागणीची पूर्तता करण्यासाठी भारतीय दलित महासंघाने पुढाकार घेतला आहे आजचे आंदोलन हा त्याचाच भाग होता या कामाला तात्काळ गती नाही दिली तर तीव्र आंदोलन स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष श्रीकात कांबळे, अनिरुद्ध कांबळे यांनी सांगितले. यावेळी भारतीय दलित महासंघाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना सविस्तर माहिती देणारे व मागणीची पूर्तता करण्यासंदर्भात निवेदन दिले सदरचे निवेदन बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियंता रवी पाटील यांनी स्वीकारले.
आंदोलनात अभिजीत बनसोडे विक्रम समुद्रे मनोज गायकवाड दयानंद कांबळे आकाश कांबळे विजय लोखंडे विशाल खांडेकर रोहन वायदंडे यासह कार्यकर्त्यांनी घोषणा देत सहभाग घेतला होता.
पुलाचे रुंदीकरण करण्यास भूसंपादनाचा अडथळा …
कोडोली बोरपाडळे राज्यमार्गावर नरसिंह मंदिरा जवळील धोकादायक वळण काढण्यास व अरुंद पुलाचे रुंदीकरण करण्यासाठी करावे लागणारे भूसंपादन विरोधामुळे अडथळा ठरत असल्याने या कामाला गती मिळालेली नाही