घोषणाबाजी करत फेरीवाल्यांच्या न्यायहक्कांसाठी आवाज उठवला
सांगली : भारताला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे उलटूनही सांगली महापालिकेच्या कारभारात इंग्रजी काळातील मानसिकता टिकून असल्याचा आरोप करत, सांगलीतील फेरीवाल्यांच्या हक्कांसाठी दलित महासंघ मोहिते गटाच्या नेतृत्वाखाली “गाडा ढकल निदर्शने मोर्चा” आज दणक्यात पार पडला.
गारपीर चौक, सांगली येथून मनपा कार्यालयापर्यंत काढलेल्या या मोर्चात हजारोंच्या संख्येने फेरीवाले, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान प्रचंड घोषणाबाजी करत फेरीवाल्यांच्या न्यायहक्कांसाठी आवाज उठवण्यात आला.
फेरीवाल्यांच्या नोंदणी प्रक्रियेत मागासवर्गीय बहुजन समाजाच्या फेरीवाल्यांना डावलले जात असल्याचा आरोप मोर्चात करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांचे उपजीविकेचे साधन धोक्यात आले असून, परिस्थिती अधिक गंभीर झाली तर अनेक जण गुन्हेगारीकडे वळू शकतात, अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली.
दलित महासंघाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व फेरीवाल्यांना तात्काळ हक्काच्या सुविधा देण्याची मागणी केली. तसेच चुकीचे नियम लावत न्यायालयाचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून सीआयडी चौकशीची मागणी केली.








