बेडगेतील स्वागत कमान प्रकरणामुळे आंबेडकरी समाज एकवटला. ज्या गावात आमच्यावर अन्याय झाले ते गाव सोडून आम्ही 90 किलोमीटर पायपीट केली. उपमुख्यमंत्र्यांना त्याची दखल घ्यावी लागली. आम्ही केलेल्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून विजय मिळवूनच आम्ही परतलो असल्याचे मत डॉ.महेशकुमार कांबळे यांनी व्यक्त केले.बेडग येथील स्वागत कमान पाडल्याऱ्यां विरोधात कारवाई करावी या मागणीसाठी बेडग ते मुंबई विधानसभा या नियोजित लॉंगमार्चच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी बोलताना ते म्हणाले, “काही जातीयवादी नेत्यांनी गावात द्वेष पसरवण्याचे काम केले आहे. आंबेडकरी समाज कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. तो आपल्या न्याय मागण्यासाठी लढला. आणि विजय मिळवून गावाकडे परत आला आहे. आता बेडग ग्रामपंचायत बरखास्त करण्यासह शासनाच्या निधीतून डॉ. बाबासाहेबांची स्वागत कमान उभारण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरूच राहणार आहे”
दरम्यान, बेडग येथील स्वागत कमान पाडापाडी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करीत दलित समाजाने बेडग गाव सोडल्याच्या घटनेची राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाने गंभीर दखल घेतली होती. आयोगाने शनिवारी सकाळी बेडग गावाला भेट देऊन स्वागत कमान पाडलेल्या ठिकाणाची पाहणी केली. कमान अनधिकृत ठरविण्याची कारणे, पाडकाम करण्यामागचा हेतू आणि दलित समाजाला गाव सोडावे लागणे याबाबतचा संपूर्ण अहवाल सात दिवसात सादर करण्याचे निर्देश अनुसुचित जाती आयोगाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिले आहेत.