वृत्तसंस्था / चेन्नई
तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी दलित नेत्याची नियुक्ती करावी, अशी मागणी पट्टली मक्कळ काची (पीएमके) या पक्षाने केल्याने तामिळनाडूत खळबळ उडाली आहे. सध्या या राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन हे आहेत. त्यांचे समर्थक असणारे व्हीसीके पक्षाचे संस्थापक थोल. थिरुमवालवन यांनी काही दिवसांपूर्वी ‘दलित कधीही सहजपणे भारताचा नेता होऊ शकणार नाही, असे विधान केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून पीएमकेने तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी दलीत नेत्याची नियुक्ती केली जावी, अशी मागणी केली आहे. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. काही काळापूर्वी उत्तर भारतात मायावतींचा जोर होता. त्यांच्या बहुजन समाज पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत होता. तथापि, त्याही देशाच्या नेतेपदी आरुढ होऊ शकल्या नाहीत, असे विधानही थिरुमवालवन यांनी केले होते.
पीएमकेचे नेते रामडॉस यांनी या विधानाचा प्रतिवाद केला आहे. भारताचा प्रमुख नेता कधीही दलित असू शकणार नाही, हे विधान चुकीचे आहे. हे घडू शकते. तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी दलित नेत्याची नियुक्ती केल्यास देशातही दलित समाजाला मोठे पाठबळ मिळू शकते. तथापि, अद्रमुक, द्रमुक अशा द्रविड पक्षांनी, अनेकदा त्यांना सत्ता मिळूनही एकदाही दलिताला मुख्यमंत्रीपद मिळू दिलेले नाही, अशी टीका रामडॉस यांनी बुधवारी पत्रकारांसमोर केली आहे.









