गुप्तचर यंत्रणेच्या इशाऱ्यानंतर गृह मंत्रालयाकडून गंभीर दखल
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
बौद्ध धर्माचे सर्वोच्च तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामा यांना गृह मंत्रालयाने झेड श्रेणीची सुरक्षा दिली आहे. गुप्तचर विभागाने (इंटेलिजेंस ब्युरो) दिलेल्या धमकीच्या अहवालाच्या आधारे त्यांना ही सुरक्षा देण्यात आली आहे. या वाढीव सुरक्षा व्यवस्थेंतर्गत 89 वर्षीय आध्यात्मिक गुरु दलाई लामा यांच्या ताफ्यात एकूण 33 सुरक्षा कर्मचारी असतील. यामध्ये त्यांच्या निवासस्थानी तैनात केलेले सशस्त्र स्थिर रक्षक, चोवीस तास सुरक्षा देणारे खासगी सुरक्षा अधिकारी आणि शिफ्टमध्ये सशस्त्र एस्कॉर्ट कमांडो यांचा समावेश असेल. याव्यतिरिक्त प्रशिक्षित ड्रायव्हर्स आणि देखरेख करणारे कर्मचारी त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी नेहमीच कर्तव्यावर दक्ष असतील.
33 सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये 10 सशस्त्र स्थिर रक्षकांचा समावेश असून ते निवासस्थानीच उपस्थित राहतील. याशिवाय 6 राउंड-डोअर पीएसओ, तीन शिफ्टमध्ये 12 सशस्त्र एस्कॉर्ट कमांडो, शिफ्टमध्ये 2 वॉचर्स आणि 3 प्रशिक्षित ड्रायव्हर्स चोवीस तास सुरक्षा कर्मचारी म्हणून उपस्थित राहतील. भारत सरकारकडून देशातील काही लोकांना विशेष प्रकारची सुरक्षा प्रदान केली जाते. देशातील महनीय व्यक्तींना धोक्यानुसार सुरक्षा पुरविली जाते. मुख्यत: एक्स, वाय, वाय प्लस, झेड, झेड प्लस सुरक्षा गृह मंत्रालयाकडून पुरविली जाते. याशिवाय, एसपीजी सुरक्षा फक्त देशाच्या पंतप्रधानांना दिली जाते. एसपीजी ही एक वेगळी फोर्स असून ती फक्त पंतप्रधानांनाच कव्हर करते.
दलाई लामा यांच्या सुरक्षेची जबाबदारी भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाकडून घेतली जाते. सध्या दलाई लामा यांची सुरक्षा त्रिस्तरीय असून त्यामध्ये हिमाचल पोलिसांच्या दुसऱ्या सशस्त्र कॉर्प्सच्या डीएसपीच्या अधीनस्थ 108 पोलीस कर्मचारी 24 तास दलाई लामा यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. याशिवाय, मध्य तिबेटी प्रशासनाच्या सुरक्षा विभागाचा सुरक्षा घेरा आहे. तसेच केंद्रीय सुरक्षा संस्थांचे अधिकारी तैनात आहेत. प्रत्येक प्रवेशद्वारावर डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर (स्कॅनर) बसवलेले असून तेथे प्रत्येक अभ्यागताची कसून तपासणी केल्यानंतरच प्रवेश दिला जातो. संपूर्ण परिसरात कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅझेट, मोबाईल फोन, बॅग किंवा इतर वस्तू घेऊन जाण्यास बंदी आहे. दलाई लामा यांचे तात्पुरते निवासस्थान असलेल्या चुगलखांग आणि नामग्याल बौद्ध मठात एकच प्रवेशद्वार असून तेथे आलेल्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जाते.









