पुणे / प्रतिनिधी :
बारसू प्रकल्पामुळे फक्त कोकणातील काही गावे बाधित होणार नाहीत. तर मानवजात व जीवसृष्टीच बाधित होणार आहे. रिफायनरी प्रकल्प हा मानवजात व जीवनाशी द्रोह असून, हा हत्येचा गुन्हाच ठरेल. म्हणूनच बारसू येथील रिफायनरी प्रकल्प तात्काळ रद्द व्हायला हवा, अशी जोरदार मागणी करीत ‘दक्षिणायन’च्या वतीने प्रसिद्ध भाषातज्ञ डॉ. गणेश देवी तसेच नाटककार महेश एलकुंचवार व अन्य लेखक, कलाकारांनी बारसूविरोधातील जनआंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
‘दक्षिणायन’ महाराष्ट्राचे निमंत्रक संदेश भंडारे आणि प्रमोद मुनघाटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे यासंदर्भात माहिती दिली. यात ते म्हणतात, कोकण हा पृथ्वीवरील, औद्योगिकरणाच्या कचाटय़ातून अजूनही बऱ्याच प्रमाणात वाचलेला, जैविक विविधतेने मानवी अस्तित्वासाठी आवश्यक अशा पर्यावरणाचा ठेवा आहे. म्हणून तेथील सर्वसामान्य लोकांनी आजवर येऊ घातलेल्या प्रदूषणकारी प्रकल्पाला प्राणपणाने विरोध केला. त्यामुळे हे प्रकल्प सरकारला रद्द करावे लागले आहेत. आता बारसू येथे येऊ घातलेल्या प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पाचे समर्थन तथाकथित विकासाचे कारण दाखवून केले जात आहे. शाश्वत विकासाच्या पर्यावरणपूरक संकल्पनेला नाकारून नवभांडवलशाही प्रवृत्ती याद्वारे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. आपल्याला विकास हवा आहे, बेरोजगारी दूर करण्यासाठी लोकांच्या हाताला काम देण्याची क्षमता या प्रकल्पात आहे, असे सांगितले जात आहे. व्यापक हितासाठी आणि देशाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी त्याग करायला पाहिजे, असे आवाहन केले जात आहे. परंतु साम्राज्यवादी शक्तींचा यामागील स्वार्थी व विनाशकारी हेतू ग्रामस्थांना समजावून सांगण्याची गरज आहे. यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी नेटाने आंदोलन चालविले आहे. या आंदोलनाला बळ देण्याची गरज आहे.
बारसू येथे प्रस्तावित रिफायनरीव इतर अनेक गावांत होणाऱ्या निःक्षारीकरण प्रकल्प, प्लास्टिक निर्माण, औष्णिक वीजनिर्मिती, धरण इ. संलग्न कारखाने-प्रकल्पांना ग्रामस्थांचा प्रखर विरोध आहे. हा विरोध घटनात्मक पद्धतीने स्वातंत्र्यदिनी किंवा प्रजासत्ताकदिनी ग्रामसभांमधे रितसर ठराव मंजूर करून व ते शासनाला सर्व स्तरावर देऊन व्यक्त झाला आहे. मुळात देशाची गरज 19 कोटी टन कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणाची असताना 24 कोटी टन तेल शुद्धीकरण केले जात आहे. अधिकचे तेल युरोपला निर्यात केले जाते. तेथील सरकारे व सत्ताधारी स्वतःच्या देशात प्रदूषण न करता ते भारतात करून घेतात. रिफायनरी व एकूणच औद्योगिकरणाबाबत सध्याच्या परिस्थितीत सत्याला धरून विचार व्हावा. या वषी उन्हाळय़ात मार्च, एप्रिल व मे महिन्यात देशात उष्णतेच्या लाटा, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, बर्फवृष्टी होत आहे. पावसाळय़ातही थोडा पाऊस पडणाऱ्या विदर्भात अतिवृष्टी होत आहे. नद्यांना पूर येत आहेत. अशाप्रकारे हवामान बदलामुळे तसेच जागतिक तापमानवाढीने अनेक संकटे येत आहेत. पिकांना फटका बसत आहे. कोकणात आंबा व इतर फळांचे फक्त 25 टक्के उत्पादन झाले आहे. म्हणूनच सर्व सुसंस्कृत माणसांनी जीवनाच्या व अस्तित्वाच्या बाजूने रिफायनरी विरोधात उभे रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
डहाके, कसबे, गवस यांचाही पाठिंबा
दरम्यान, ज्येष्ठ लेखक रावसाहेब कसबे, यशवंत मनोहर, छाया दातार, वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर, प्रज्ञा दया पवार, राजन गवस, अनुराधा पाटील कौतिकराव ठाले पाटील, इब्राहिम अफगाण, निरंजन टाकले, प्रवीण बांदेकर, अभय कांता, प्रमोद मुजुमदार, संध्या नरे पवार, अजय कांडर, किरण गुरव, रणधीर शिंदे, नीतीन रिंढे, प्रभू राजगडकर, संजीव चांदोरकर, प्रफुल्ल शिलेदार, कुसुम अलाम, राम काळुंखे, गोविंद काजरेकर, अमिताभ पावडे, संजीवनी पावडे, दत्ता घोलप, संजीव चांदोरकर, प्रफुल्ल शिलेदार, जयंत भीमसेन जोशी, निशा साळगावकर, दीपा पळशीकर, माधव पळशीकर, छाया सावरकर, अपर्णा फडके, रणजित मेश्राम यांनीही या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.








