राधानगरी अभयारण्यातील जैवविविधतेचा अनुभव घेण्याची संधी
राधानगरी/महेश तिरवडे : पश्चिम घाटातील जैवविविधतेने नटलेले, महाराष्ट्रातील पहिले व सर्वात जुने अभयारण्य म्हणून ओळखले जाणारे राधानगरी अभयारण्यातील दाजीपूर जंगल सफारी 24ऑक्टोबर पासून पुन्हा पर्यटकांसाठी खुले होत आहे. सध्या पावसाळी वातावरण असल्याने पर्यटकांची मागणी लक्षात घेऊन सद्यस्थिती वाहन जिथे जाते तिथं पर्यत पर्यटन सफारी सुरु राहणार अशी माहिती वनक्षेत्रपाल राजेंद्र घुनकीकर यांनी दिली
दरवर्षी जून ते ऑक्टोबर या कालावधीत पावसाळ्यामुळे अभयारण्य बंद ठेवण्यात येते. मात्र यंदा १४ मेपासूनच पावसाला सुरुवात झाल्यामुळे १५ मेपासूनच प्रवेश बंद करण्यात आला होता. आता हिवाळ्यातील आल्हादायक हवामान, हिरवेगार जंगल, वन्य प्राणी व पक्ष्यांचे मुक्त संचार यामुळे निसर्गप्रेमींना पुन्हा एकदा जंगलाचा आनंद घेता येणार आहे.
या जंगल सफारीदरम्यान ठक्याचा वाडा, मुरडा बांबर, लक्ष्मी तलाव, झांजूचे पाणी, सांबर कुंड, शिवगड, हाडाक्याची सरी, सापळा, सावराई सडा या ठिकाणी असलेले नैसर्गिक पाणवठे व निरीक्षण मनोरे पाहता येणार आहेत. या सफारीस दररोज सकाळी ६ वाजता सुरुवात होणार असून दुपारी २ पर्यंत प्रवेश दिला जाणार आहे मात्र प्रत्येक मंगळवारी अभयारण्य बंद राहणार आहे.
अभयारण्यात दुचाकी व खासगी वाहनांना बंदी असून, वनविभाग व वन्यजीव विकास समितीमार्फत चालविण्यात येणाऱ्या ओपन किंवा बंद जीपमधूनच प्रवेश दिला जाणार आहे.स्थानिक युवक पर्यटकांना गाईड म्हणून जंगलाची माहिती देणार आहेत. प्रवेश फी व वाहन भाडे भरून ही सफारी करता येईल. याशिवाय दाजीपूर येथील जंगल माहिती केंद्र आणि राधानगरीतील फुलपाखरू उद्यान यांना भेट देता येईल.
आजपासून अभयारण्य सफारीसाठी खुले होणार
संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळी सुट्टीत पर्यटन जोमात सुरु असताना जिल्ह्यातील गव्यासाठी प्रसिद्ध व जागतिक वारसा स्थळात नोंद असलेले दाजीपूर अभयारण्य अभयारण्य बंद ठेवणे अन्यायकारक आहे असे गोकुळ संचालक अभिजीत तायशेटे यांनी आंदोलन करून वन विभागाने जंगल सफारी तात्काळ सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.
त्या पार्श्वभूमीवर या मागणीची दखल घेऊन, 24ऑक्टोबर पासून अभयारण्य सफारीसाठी खुले होणार आहे. जंगल सफारी सुरू होणार असल्याने स्थानिक व्यापारी, जीप चालक, हॉटेल व रिसॉर्ट आणि पर्यटन क्षेत्रातील इतर घटकांनी वन्यजीव विभागाच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. यामुळे दिवाळीच्या सुट्टीत पर्यटकांची निराशा टळली असून, स्थानिकांच्या रोजगाराला मोठा हातभार लागणार आहे.
वन्यजीव विभाग व स्थानिक प्रशासनाकडून निवास व भोजनाची सुविधा देखील करण्यात आली आहे.निसर्गातील जैवविविधतेचा अद्वितीय अनुभव घेण्यासाठी सर्व पर्यटकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन वनक्षेत्रपाल राजेंद्र घुनकीकर यांनी केले आहे.









