पूर्वीपासूनची परंपरा : गावात विठूनामाचा घुमला गजर
किणये : रिमझिम पाऊस, टाळ-मृदंगाचा गजर आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात कर्ले गावात सोमवारी अनोख्या पद्धतीने दहीकाला साजरा करण्यात आला. ज्यावेळी कर्ले हे गाव वसले तेव्हापासून गावात ही परंपरा आहे. ती आजही कायम टिकवून ठेवण्यात आलेली आहे. सोमवारी गुरुपौर्णिमेनिमित्त गावात कडक वार पाळणूक करून दहीकाल्याचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. तालुक्याच्या पश्चिम भागात कर्ले गावाची निर्मिती झाली. तेव्हापासून गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरसमोर दहीकाला साजरा करण्यात येतो. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला वारकरी जातात. हे वारकरी पंढरपूरहून परत आल्यानंतर पंढरपूरहून आणलेला प्रसाद या दहीकाल्यासाठी वापरला जातो. गेल्या शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा गावातील तरुण वर्ग व बालचमू आजही मोठ्या उत्साहात साजरा करतात.
सोमवारी दिवसभर वार पाळणूक करून सकाळी विठ्ठल-रखुमाई मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर दुपारी बाराच्या दरम्यान मंदिरासमोर लाकडी खांब उभारण्यात आला. त्याला आणखी एक आडवे लाकूड लावून या लाकडाच्या एका टोकाला दही असलेले मडके बांधण्यात आले. मंदिरसमोर दिवसभर भजन व इतर धार्मिक कार्यक्रम झाले. सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान पावसाची रिमझिम सुरू होती यावेळी या दहीकाल्याच्याभोवती बालचमू व ग्रामस्थांनी पाच प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर उत्साहाने बालकांनी दहीहंडी फोडली व उपस्थित सर्वांना त्याचा प्रसाद वाटण्यात आला. यावेळी चांगला पाऊस येऊ दे, गावातील सर्व नागरिकांचे आरोग्य उत्तम राहू दे, रोगराई दूर होऊ दे व पीकपाणी चांगले बहरून येऊ दे, असा गाऱ्हाणा ग्रामस्थांच्यावतीने घालण्यात आला. या निमित्त सर्व ग्रामस्थ एकत्रित आले होते.









