थर रचण्यासाठी तरुणाईची धडपड
बेळगाव : मुंबई-पुण्याप्रमाणेच आता बेळगावमध्येही दहीहंडीचा थरार अनुभवायला मिळाला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत दहीहंडीचा उत्साह दिसून आला. शहरासोबत उपनगरांमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी तरुणाईची धडपड सुरू होती. पावसाची रिपरिप सुरू असल्याने काही प्रमाणात तरुणाईचा हिरमोड झाला. कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी मुंबई-पुणे शहरात दहीहंडीचा उत्साह पहायला मिळतो. उंचच उंच दहीहंडी फोडण्यासोबत थर रचण्यासाठी स्पर्धा सुरू असते. मागील काही वर्षात बेळगावमध्येही अशीच स्पर्धा रंगत आहे. शनिवारी बेळगाव शहरातील मारुती गल्ली, गवळी गल्ली, कामत गल्ली, कॅम्प तसेच अनगोळ येथील राजहंस गल्ली, गांधी स्मारक, भांदूर गल्ली या भागामध्ये रात्री उशिरापर्यंत तरुणाईचा जल्लोष सुरू होता. डीजेच्या तालावर गोविंदाची गाणी लावून तरुण मंडळी थिरकत होती. बेळगावमध्ये 6 ते 7 थर रचून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न सुरू होता. सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे काहीसा हिरमोड झाला असला तरी दहीहंडी पाहण्यासाठी तरुणाईची गर्दी झाली होती.









