मुलांना सांभाळतात भाडेतत्वावरील पिता
चीनमध्ये अनेक गोष्टी भाडेतत्वावर मिळतात. तेथे कुठलीही सामग्री किंवा प्रेयसी, प्रियकर, पत्नी आणि अन्य कुठलाही नातेवाईक काही तासांसाठी भाडेतत्वावर मिळविता येतो. आता तर तेथे काही तासांसाठी लहान मुलांसाठी वडिल देखील भाडेतत्वावर मिळू लागले आहेत. ही सेवा छोट्या मुलांसाठी सुरू करण्यात आली आहे, जेणेकरून मुलांपासून काही वेळासाठी वेगळे होत महिलांना स्वत:साठी काहीतरी करता येईल.

ही सेवा चीनच्या एका बाथहाउसमध्ये सुरू करण्यात आली असून याला मोठी पसंती मिळत आहे. सोशल मीडियावर याच्याशी निगडित बातम्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. चीनच्या लियॉन्गिंग प्रांतातील शेनयांगमध्ये ही सेवा सुरू झाली आहे. ही सेवा लहान मूल असलेल्या महिलांसाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आईला होता येणार रिलॅक्स
चीनमध्ये बाथहाउसचा प्रचलन मोठ्या प्रमाणावर आहे. येथे लोक रिलॅक्स होण्यासाठी बाथहाउसमध्ये येत असतात आणि त्यांना तेथे वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देण्यात येतात. परंतु या बाथहाउसमध्ये महिला अन् पुरुषांसाठी वेगवेगळे विभाग असतात. अशा स्थितीत स्वत:च्या लहान मुलांना तेथे नेण्यास महिलांना अवघड वाटत होते. यावर तोडगा काढत रेंट अ डॅड सेवा सुरू करण्यात आली आहे. याच्या अंतर्गत मुलांना तेथील पुरुष सांभाळतील आणि महिलांना बाथहाउसमध्ये सेवेचा आनंद घेता येईल.
कल्पनेचे कौतुक
एखादी महिला स्वत:च्या लहान मुलामुलींना तेथे घेऊन आल्यास या सेवेंतर्गत तिला ही सेवा मिळणार आहे. या महिलेच्या मुलांना मनोरंजनासाठी सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहेत. सोशल मीडियावर या सेवेचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.









