महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार हे यापूर्वी कधीच प्रेमळ स्वभावासाठी प्रसिद्ध नसले, तरी सध्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या चांगलेच प्रेमात पडलेले दिसतात. मागच्या आठवडाभरात दादांनी त्यांच्यासंदर्भात केलेली विधाने म्हणजे या गुलकंदी प्रेमाचाच आविष्कार म्हणता येईल. एरवी खडूस, खट्याळ, फटकळ, तिरसट अशीच काहीशी दादांची प्रतिमा. भर कार्यक्रमात पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कानपिचक्या देणे, कान टोचणे, प्रसंगी पाणउतारा करणे, हा आजवरचा त्यांचा छंदच राहिलेला आहे. तंबाखूवरून त्यांनी आर. आर. आबांवर केलेली टिप्पणी बऱ्याच जणांच्या स्मरणात असेल. कपड्यावरील इस्त्रीच्या घडीपेक्षा इतर गोष्टींना महत्त्व देण्याचा त्यांनी जयंतरावांना दिलेला सल्लाही तसा खूप जुना नाही. काकांच्या राजीनामानाट्याच्या वेळची त्यांची दमबाजी तर अगदी अलीकडचीच. त्याच दादांची वाणी साखरेच्या पाकात डुंबून जाऊन मधुर होणे, कुणा बापड्यास जरूर आश्चर्यकारक वाटेल. किंबहुना, प्रेमाची (की सत्तेची?) ताकद माणसात किती बदल घडवू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणून त्याकडे पहावे लागेल. गृहमंत्री अमित शहा हे देशाचे पोलादी नेते म्हणून ओळखले जातात. परंतु, त्यांचे खरे व्यक्तिमत्त्व उलगडून दाखविण्याचा प्रयत्न भाजपाच्या नेत्यांनीही कधी जितका केला नसेल, इतका दादा करतात, तेव्हा ते नक्कीच इतरांपेक्षा उठून दिसतात. अमित शहा हे महाराष्ट्राचे जावई आहेत, हे तसे सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु, त्यापुढे जाऊन अमित शहा यांचे गुजरातपेक्षा महाराष्ट्रावर अधिक प्रेम असल्याची अजितदादांनी दिलेली ग्वाही लक्षवेधक ठरते. आजवर आडून-आडून अमितभाई हे कसे गुजरातचे आहेत, मोदी व शहांचा वेगवेगळे विकास प्रकल्प वा संस्था गुजरातकडे वळविण्याचाच कसा डाव असतो, हे सांगितले गेले आहे. सोशल मीडियावरही या मजकुराचा रतीब घातला जातो. अशा सगळ्या शंकाकुशंकांचा माहौल तयार झालेला असताना अजितदादांनी त्यांना दिलेली ‘महाराष्ट्रप्रेमी’ ही उपमा सगळ्यालाच छेद देते. स्वाभाविकच भविष्यात शहा यांच्याबद्दल शंका घेणे विरोधकांस तितकेसे सोपे नसेल. दुसऱ्या बाजूला तुम्ही थोडा उशीर केलात. मात्र, आता तुम्ही योग्य जागी आहात, यातला शहा यांच्या विधानातील अर्थही समजून घेतला पाहिजे. अजितदादा आणि मोदी यांच्यातील नवे नातेही असेच स्नेहाने ओथंबलेले. ‘लोकमान्य टिळक पुरस्कार’ सोहळ्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा दादांसमवेत झालेला मोदी यांचा संवाद अधिक बोलका ठरलेला दिसतो. मोदींनी पुढे येत दादांच्या हातावर हात थोपटत दिलेली शाबासकी नि त्यावरील दादांचे ते स्मितहास्य पॅमेऱ्यापलीकडचेच. त्यानंतर दोन-पाच दिवसांतच ‘देशात नरेंद्र मोदी यांच्यासारखा दुसरा मजबूत नेता नाही,’ हे त्यांनी सांगणे म्हणजे कळसाध्याय ठरावा. मुख्यमंत्रिपदावर आरूढ झाल्यापासून मोदीस्तुती हा एकनाथ शिंदे यांचा एकमेव अजेंडा राहिला आहे. कार्यक्रमात भले डुलकी लागो. भाषणात ते कसलीही कसर सोडत नाहीत. मात्र, दादांनी मोदींना पर्याय नसल्याचे सांगत उधळलेली विविधरंगी स्तुतीसुमने अधिक नजरेत भरणारी. त्यामुळे कधी नव्हे, ती संघ व भाजपा वर्तुळात दादांची लोकप्रियता शिगेला पोहोचलेली पहायला मिळते. भले धरणातील मूत्रविसर्जनाच्या वक्तव्यावरून एकेकाळी त्यांच्याविरोधात रान उठवले गेले असेल. पण, आता तेच दादा सत्ताधारी वर्तुळात सर्वप्रिय ठरतात. याला काळाचा महिमा म्हणायचे की आणखी काही, हे ज्याने त्याने ठरवायचे. वास्तविक काका शरद पवार यांच्या मुशीत दादांचे व्यक्तिमत्त्व घडले. असे असले, तरी दादांनी कायमच आपले स्वतंत्र व्यक्तिमत्त्व जपले. पवारसाहेबांसारखा लोकप्रिय नेता असूनही महाराष्ट्रात राष्ट्रवादी सत्तेवर येऊ शकत नसल्याची जाणीव पक्षाला कुणी करून दिली असेल, तर ती दादांनीच. आता नेमके कोण ताकदवान, याचे उत्तरही त्यांनी देऊन टाकले आहे. बहुदा काकांनाच त्यांना हे सांगायचे असावे. फडणवीस म्हणतात, त्याप्रमाणे दादांची गाडी सध्या सुसाट आहे. त्यामुळे त्यांचा हात धरणे कुणाला शक्य होणार नाही. जेजुरी दौऱ्यात शिंदे, फडणवीस व दादांनी एकत्रितरीत्या आळवलेला ‘तुझ्या गळा माझ्या गळा’चा सूरही बरेच काही सांगून जातो. कालपरवापर्यंत भाजपासारख्या पक्षाला प्रादेशिक पक्षांचे वावडे आहे, असे बोलले जायचे. मात्र, शिंदे गटासह दादा गटालाही गोंजारण्याची भूमिका पाहता ‘सबका साथ, सबका विकास,’ हा नारा कृतीशील पद्धतीने पक्षाकडून राबविला जात असल्याचे दिसून येते. दादांच्या विधानांनी तर प्रादेशिक व राष्ट्रीय पक्ष ही सीमारेषाच पूसून जावी. 2024 ची निवडणूक भाजपासाठी महत्त्वाची असेल. या निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच अजितदादांनी एनडीएमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सकृतदर्शनी काका व पुतण्यांचे दोन वेगवेगळे गट पडलेले पहायला मिळतात. या आघाडीवर अद्याप संभ्रमाची स्थिती असली, तरी आपण एनडीएमध्ये जाणार नसल्याचे काकांनी निक्षून सांगितले आहे. आगामी विधानसभा निवडणुकही तोंडावर आहे. आपली मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा अजितदादांनी कधीही लपवून ठेवलेली नाही. मोदी व शहा यांच्या गुडबुकमध्ये त्यांचा समावेश झाला आहे, ही त्यांची जमेची बाजू म्हणता येईल. त्यामुळे आज ना उद्या त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळेल का, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल. बाकी काही असो. ‘सत्ता’ या दोन अक्षरातच सगळी जादू सामावलेली असते. सत्तेची एक हलकीशी झुळूक कधी कुणाचे मन:परिवर्तन करेल, याचा नेम नसतो. कदाचित दादांमधील बदल हाही सत्तेच्या अभिलाषेतून झाला असावा. कामाची धडाडी, झपाटा, बेधडक वृत्ती ही या उभयतांमधील काही साम्यस्थळे ठरतात. मोदी व शहा यांनी 2024 समोर ठेऊन दादांना खेचले, हे खरे असेलही. परंतु, त्यांची कामाची पद्धत या दोघांना अधिक भावली, असेही म्हणतात. हा सगळा त्रिकोण यातून तयार झाला असावा, असे म्हणण्यास नक्कीच जागा आहे. आता मतदार या मेतकूटावर किती प्रेम दाखवितात, हेच पहायचे.
Previous Articleझारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांना ईडीचा समन्स
Next Article पत्नीला उचलून घेत पळण्याची प्रथा
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








