मघा पूर्वाच्या पावसातून तू येतोस! कवंडळं, हरणफळं, श्रावडाची पानं, तरारून आलेली हिरवी झाडं, विविधरंगी फुलांनी सजलेले सडे, पावसाने लखलखीत झालेली कातळं या सगळ्यातून येतोस. वाऱ्यावर डुलायला लागलेली रेशमी भातशेतं, वेगवेगळ्या आवाजात एक सारखे आळवणारे पक्षी, यांच्यासोबत तू येतोस. आकाशात गच्च भरलेल्या काळ्याकुट्ट ढगातून पावसाच्या धारांसोबतच तू येतोस. श्रावणात थोडा थोडा सूर्य दिसायला लागतो त्या सूर्याच्या उजेडातच येतोस की काय असं वाटतं. फुललेल्या बाजारपेठा, सजावटीचे रंगीबेरंगी सामान, कुशल बोटाने तयार केलेली मखरं, मंडपी सजवायला लागणारी कांगणं, कवंडळं, घोसे हे सगळं बघत बघतच येतोस असं वाटतं. चार चार महिने आधीच बुक झालेल्या ट्रेन, दुथडी भरून वाहण्राया बसेस, ट्रॅफिक जाम होईल एवढा भरलेला रस्ता, असंख्य कार आणि कोप्रयात कोनपटात घुसून काहीही करून कुणी तिजेला तर कोणी चवथीला अशी झाडून कोकणात उतरणारी सगळी चाकरमानी मंडळी यांच्यासोबतच बसून येतोस की काय? बरं तसा तू सगळीकडे असतोस. ब्रह्मदेशापासून पार तिकडे दक्षिण अमेरिकेत इंका माया संस्कृतीतही कुठेतरी तू रुजलेला आहेस असं वाचायला मिळतं. थायलंड मलेशिया इथे तर तू अगदी असतोसच. अमेरिकेतल्या डिस्नेलँडमध्ये सुद्धा भली मोठी मूर्ती आहे तुझी म्हणे. म्हणजे इथेही तू आहेसच. अगदी भर लंडनमध्ये सुद्धा तुझा शिस्तीत पाहुणचार केला जातो. म्हणजे तिथेही आहेस. आणखीन कुठे कुठे तू विमानात बसून पण जात असतोस ना? म्हणजे तिथेही सगळीकडे तू असणारच आहेस.
पण तुझा खरा उत्साह मुंबई, पुणे, नाशिक आणि महाराष्ट्रातल्या इतर सगळ्या मोठमोठ्या शहरातून खाली कोकणात उतरताना एवढा टिपेला कसा काय पोहोचतो हे देव जाणे. किंवा आम्ही भाबडे! प्रत्येकाला तू आपला वाटतोस ना! थोड्या दिवसासाठी येऊन जाणारा पाहुणा. तो सगळीकडे आहे. रोजचं वेगळं असलं तरी पण पाहुणा बाळ म्हणून तुला खास आमंत्रण असतं ते भर भाद्रपदात. आणि माहेरवाशिणीचं मूल पाहुणं म्हणून आलं की त्याचं कौतुक जरा जास्तच! मग अगदी तुझी आई तुला न्यायला येईपर्यंत आणि तिचा पाहुणचार होईपर्यंत तू मुक्काम ठोकून असतोस. भाद्रपदात तुला पाठवावं आणि पुढे तुझ्या आईला पण माहेरपण घडावं यासाठी तुझ्या वडिलांचं कौतुक श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी आणि श्रावण अमावास्येलाही केलं जातं. पावणे सोयरे रागवायला नको ना यासाठी हे सगळं केलं जातं. पण तुझी येण्याची तर्हाच निराळी असते.
यायच्या आधी बॅग भरायची सुरुवात आषाढातच करीत असावास. काय काय नसतं त्यात? सुखकर्तेपण, दु?खहरण, विघ्नाची वार्ताच नुरवणे आणि प्रेम, कृपा पुरवणे. या सगळयांचं मोठ्ठं गाठोडं भरून घेऊन येतोस. आम्ही तुला काय देणार रे मोदक? तूच तर मोद देणारा आहेस! माणसांमाणसांतल्या गोडव्याचा मोदक तू हाती घेऊनच येतोस. तू नक्की का येतोस आणि कशासाठी येतोस हे हजारो वर्षांपूर्वी कोणी कोणी लिहून ठेवलंय. तुझ्यासाठी मंत्र, स्तोत्र, आरत्या कोणी कोणी काय काय करून ठेवलंय. आणि शेकडो वर्षं लोक ते बघत आहेत. तू आपल्या घरी निघून जातोस तेव्हा घराला येणारं रितेपण आणि घरातल्या देव्ह्रायात किंवा वाड्यावरच्या पट्टीत बसलेल्या तू, मी काय कुठे गेलो नाहीये. इथेच आहे असं जेव्हा हळूच खुणावतोस तेव्हा घराला मिळणारा दिलासा या सगळ्या गोष्टीतूनही आम्हाला शिकता येत नाही हाच तर मोठा प्रश्न आहे.
वास्तविक कुठल्याही कार्याची सुरुवात तुझं नाव घेतल्याशिवाय होत नाही. पहिलेपणाचा मान माणसाला सगळीकडे हवाच असतो. आणि पहिलेपणाचा मान तुझ्या ध्यानीमनी नसताना पहिलेपणाची माळ येऊन तुझ्या गळ्यात पडली. आता जो पहिला जातो त्याला ठेचा लागण्याची शक्यता जास्ती असते. पहिलेपण टिकवणं मोठं कठीण असतं. येणारी संकटं, वादळं पहिल्यांदा येण्रायावर जातात आणि पुढच्यास ठेच मागचा शहाणा ही म्हण जन्माला येते. या सगळ्या ठेचांची जबाबदारी तू घेतोस. आपल्याला मिळालेल्या ठेचा लक्षात ठेवतोस आणि पाठून येण्रायांसाठी सुखाच्या पायघड्या अंथरत पुढे निघून जातोस. तुझ्या वडिलांकडून शिकलास का रे हे सगळं? कारण अख्ख्या जगाला संपवून टाकेल असं हलाहल त्यांनीच पचवलं होतं. ते महादेव झाले ते काय उगीचच? तुझ्या घराचं वळणच तसं. सगळ्यांवरचं संकट झेलण्याचं काम तुझ्या वडिलांनी केलं आणि सगळ्यांच्या वाटणीच्या ठेचा स्वत: खाऊन त्यांना मार्ग दाखवण्याचं काम तू करतोस. आणि तुझी आई जगन्माता! प्रेम कसं करावं, एखाद्यासाठी सर्वस्व ओवाळून कसं टाकावं याचा साक्षात आदर्श म्हणजे तुझी आई. एकेकाळी जिथे नवऱ्याचा अपमान झाला तिथे तांडव करून स्वत:ला अग्निकुंडात बेदिक्कत झोकून देणारी ही मानी गौरी! कदाचित त्याची आठवण म्हणूनच की काय दरवर्षी तिला माहेरपणासाठी कितीतरी वेळा बोलवायचा सोहळा आम्ही करतो. पण त्याचा पहिला मुहूर्त लागतो चैत्रात. नि तिथून पुढचा मुहूर्त लागतो मग अक्षयतृतीयेला. आणि खरं माहेरपण होतं ते आम्ही तुला बोलावतो तेव्हाच. बाकी सगळीकडे तू बरोबर येशील असं नसतं पण यावेळी मात्र आजोळी तुला पुढे पाठवलं जातं. मागाहून ती तुला घ्यायला येते. तीन दिवसाचा पाहुणचार. तिस्रया दिवशी निघायचं. माहेराहून किती रागावून गेली असली तर माहेरची मोठी अभिमानी! तुम्ही सोळा भाज्या करा सोळा कोशिंबिरी करा, तळण करा, पुरणावरणाचा स्वयंपाक करा पण कुठे तिला भाकरी लागते तर कुठे पडवळाची कढी. माहेर साधं असलं तरी माझ्यासाठी ते अपूर्वाईचं आहे असं ती सांगते. तुला येताना ती बजावते का रे दहा वेळा? तिथे गेल्यावरती सारखं काहीतरी मागत बसू नकोस. जे लोक देतील ते गोड मानून घे.
म्हणून पहिल्या दिवशी साग्रसंगीत उकडीच्या मोदकाचा नैवेद्य मोठ्या चवीने खाणारा तू शेवटच्या दिवशी फक्त दहीपोह्यांची शिदोरी घेऊन निघतोस. काय काय दाखवतोस रे आम्हाला तू? तेवढ्या आठ दहा दिवसांत दुनियादारी शिकवतोस तू. मातीपासून घडणं आणि मातीशी एकरूप होणं शिकवतोस. आंध्रप्रदेशात तुला घडवण्याची एक अभिनव पद्धत आहे. घरातली सर्वात अनुभवी, कर्ती स्त्राr वारुळाच्या मातीपासून तळहाताएवढ्या तुला घडवते. मग तुझं पूजन करतात आणि तिस्रया दिवशी तू निघतोस तिथून. बस्स आयुष्य क्षणभंगुर असतं हे असं कळावं? वर्षभर मान टाकून पडलेली घरं केवळ तुझ्या स्वागतापुरती तरी का होईना जागी होतात. चार दिवस का होईना झांजा, टाळ, मृदुंग वाजतात. आरत्या होतात. फुलं, धूप, उदबत्त्यांच्या सुगंधाने घरं दरवळतात. महिनोन्महिने पाणी न लागलेल्या देवांची कधीतरी पूजा होते.घर बंद करताना तेवढा एक क्षण तरी जाण्रायांच्या घशाशी आवंढा येतो. बाप्पा, रिकामी भयाण होत चाललेली खेड्यातली घरं, आणि प्रचंड शुकशुकाट असलेले गावातले हल्लीचे रस्ते, कधीच जाग न आलेली घराची ती दारं, ह्यातून आम्हाला माणूसच मिळत नाही तर देव कुठून रे शोधायचा? तू आहेस तेवढाच काय तो ओलावा! येत जा बाबा असाच. पाठीमागचं फार धूसर होऊ लागलंय. आपलं गाठोडं गुंडाळून तुझ्यासोबतच यायची वेळ दिसायला लागली आहे लांबवर! तेव्हा माझ्यासाठी थोडा थांब बरं का!
– अर्पणा परांजपे-प्रभु








