कोल्हापूर / सुधाकर काशिद :
कोल्हापुरात ताराराणी चौक या मुख्य मार्गावरून बहुतेक जण प्रवेश करतात. शहरात आलं की या कॉर्नरवरूनच पुढे जातात, सिग्नल चालू असला की हमखास या कॉर्नरलाच थांबतात, थांबलं की आपोआपच या कॉर्नर सभोवती प्रत्येकाची नजर फिरत राहते. कोपऱ्यात एक पुतळा. त्यामुळे हा अर्धा पुतळा कोणाचा असेल याचा विचार साहजिकच मनाला चादून जातो. तोवर सिग्नल पडतो. त्या क्षणी या पुतळ्याचा विचार आपोआपच बाजूला पडतो, आणि पुतळा ज्या माणसाचा तो माणूस या अनोळखी गर्दीत आणखी घट्ट वेढला जातो. कोल्हापुरातला हा दिवसातला १७-१८ तास गर्दीच्या विळख्यात अडकलेला हा पुतळा अॅड. शंकरराव दाभोळकरांचा आणि त्यामुळेच या कॉर्नरला नावही दाभोळकर कॉर्नर…
शहराच्या मुख्य मार्गावरचा वाहतुकीने खचाखच भरलेल्या या कॉर्नरचे नाव सर्वांच्या तोंडात किंवा दाभोळकर कॉर्नर म्हटलं की तो कुठे आहे हे कोणाला सांगावं लागत नाही. इतका हा कॉ र्नर प्रसिद्ध पण वास्तव हे की हे दाभोळकर कोण हे मात्र या रस्त्यावरून जाणाऱ्या १०० पैकी ९० जणांना माहित नाही आणि नव्या पिढीला तर काहीच माहित नाही. अर्थात त्यामुळे या दाभोळकरांचे काही बिघडत नाही. पण आपल्याला दाभोळकर माहीत नसते नसणे हे मात्र आपल्या कोल्हापूरकरांना नक्कीच शोभत नाही. तर ज्यांचे नाव या कॉर्नरला, ज्यांचा पुतळा या कॉर्नरला ते दाभोळकर म्हणजे कोण? तर हे दाभोळकर म्हणजे अॅङ शंकरराव दाभोळकर, ते एलएल.बी. त्या काळातले नामवंत अॅडव्होकेट, कोल्हापुरात साईक्स लॉ कॉलेज होते. आत्ताचे बी टी कॉलेज म्हणजे त्यावेळचे लॉ कॉलेज.
ब्रिटिश गव्हर्नर साईक्स यांचे नाव या कॉलेजला. या कॉलेजमध्ये ते प्राध्यापक होते. नंतर प्राचार्य झाले. अगदी नाममात्र म्हणजे केवळ एक रुपया पगार ते घ्यायचे. या माणसाचे शरीर भरदार आणि त्याचे ज्ञानही भरदार. त्यामुळे त्यांची बघता क्षणी समोरच्यावर छाप पडायची साधारण 1937 सालात त्यांनी अनाथ महिला श्रमाची स्थापना केली. कोल्हापूरच्या सामाजिक परंपरेला त्यांनी एका वेगळ्या कामाची जोड दिली. ते कोल्हापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले. याशिवाय खेळाच्या क्षेत्रात कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन, कोल्हापूर बार असोसिएशन, रोटरी क्लब, शेतकरी सहकारी संघ, इलाका पंचायत, जिल्हा मध्यवर्ती बँक, महालक्ष्मी बँक अशा संस्थांचे पदाधिकारी पद त्यांनी भूषवले त्यामागे केवळ नैतिकता हेच त्यांचे बळ होते. त्यामुळे जिल्हा बँक नगराध्यक्ष अशी पदे भोगूनही भ्रष्टाचार हा शब्द त्यांच्या कारकीर्दीला कधी जोडला गेला नाही.
आता जिथे दाभोळकर कॉर्नर आहे तेथे त्यांचे कौलारू पण भव्य असे निवासस्थान होते. घराच्या पाठीमागेच अनाथ महिला आश्रम होता.समोर घाडगे सरकार, बेनाडीकर, खानविलकर सरकार यांचे बंगले होते. दाभोळकरांच्या बंगल्यामागे न्यू शाहूपुरी वसली होती. दाभोळकरांच्या पत्नी अहिल्याबाई दाभोळकर या स्त्राrरोग तज्ञ होत्या. सीपीआर हॉस्पिटलच्या पिछाडीस आता जेथे दीपक वडा आहे तेथे त्यांचा दवाखाना होता. दाभोळकर बाईचा दवाखाना अशीच साधी सोपी त्याची ओळख होती. या दवाखान्यात उपचार मात्र हा स्टेटस सिम्बॉल होता. या दवाखान्यात जन्मलेल्या बाळाचा जन्म दाखला सोबतच दिला जात होता .आणि जन्म दाखल्याचे काळ्या-शाईत लिहिलेले रजिस्टर म्हणजे एक अस्सल दस्तऐवज सरकारी कागदपत्रात मानला जात होता. विख्यात शास्त्रज्ञ जयंत नारळीकरांचा जन्म याच दवाखान्यात. येथे स्वच्छता तर इतकी की दवाखान्यात कदाचित माशीही विचार करून शिरायची.
स्वच्छता आणि आरोग्य याचा खूप जवळचा संबंध असल्याने या दाभोळकर बाई वाढलेली नखे, नखातील घाण, अस्तावस्त केस, कपड्यांची स्वच्छता याबद्दल कोणाचीही भिड भाड न ठेवता चारचौघात बोलायच्या. त्यामुळे या दवाखान्यात जाताना लोक खूप काळजी घ्यायचे .म्हणजेच स्वच्छतेला प्राधान्य द्यायचे. दाभोळकर सार्वजनिक जीवनात कायम गुंतलेले. त्यामुळे त्यांच्या नावाचा दबदबा खूप मोठा. हा माणूस मनाचा इतका मोठा की आपली संपत्ती त्यांनी ट्रस्टला दान करून टाकली. या संस्थेमार्फत आता एक दवाखानाही चालवला जात आहे.
दाभोळकरांची ही कारकीर्द काळाच्या ओघात हळूहळू विसरली गेली. पण दाभोळकर कॉर्नर हा कोल्हापुरातील मुख्य चौक त्यांच्या नावाने आजही ओळखला जात आहे. त्यामुळे दाभोळकर कॉर्नर सर्वांना माहिती आहे. पण शंकरराव दाभोळकर यांचा कोल्हापूरकरांसाठी किती मोठा वाटा आहे हे खूप कमी जणांना माहिती आहे. हे कोण दाभोळकर? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. पण नावामागचा इतिहास असा लखलखीत आहे. आणि तो आपण नव्या पिढीला समजावून सांगणे हीच त्यांच्या ऋणातून उतराई आहे.








