वृत्तसंस्था/ हैदाबाद
नवव्या प्रो कबड्डी लिग स्पर्धेतील झालेल्या विविध सामन्यात दबंग दिल्ली, पुणेरी पलटन आणि तामिळ थलैवाज यांनी प्रतिस्पर्ध्यावर विजय नोंदवले. दबंग दिल्लीने हरियाणा स्टीलर्सचा, पुणेरी पलटनने बेंगळूर बुल्सचा, तामिळ थलैवाजने बंगाल वॉरियर्सचा पराभव केला.
दबंग दिल्लीने हरियाणा स्टीलर्सचा 42-30 अशा 12 गुणांच्या फरकाने पराभव केला. या सामन्यात दबंग दिल्लीचा हुकमी कबड्डीपटू नवीनकुमारला योग्यवेळी सूर मिळाला. दबंग दिल्लीचा कर्णधार नवीनकुमारने या सामन्यात 15 गुण नोंदवले. मध्यंतराला केवळ दोन मिनिटे बाकी असताना दबंग दिल्लीने हरियाणा स्टीलर्सचे सर्व गडी बाद करत मध्यंतरावेळी 23-13 अशा 10 गुणांची आघाडी मिळवली होती. सामन्याच्या उत्तरार्धात के. प्रपंजनच्या सुपर रेडवर हरियाणा स्टीलर्सला चार गुण मिळाले. त्यानंतर दिल्लीच्या विजय मलिकने आपल्या चढाईवर दोन गुण घेतले. आशू मलिकने शेवटच्या दोन मिनिटामध्ये दबंग दिल्लीची आघाडी आपल्या सुपर रेडवर पाडवली आणि अखेर हा सामना दबंग दिल्लीने 12 गुणांच्या फरकाने जिंकला.
पुणेरी पलटनने बेंगळूर बुल्सवर 35-33 अशा केवळ दोन गुणांच्या फरकाने निसटता विजय मिळवला. दोन्ही संघांचा खेळ दर्जेदार झाला. पहिल्या दहा मिनिटामध्ये पुणेरी पलटनने 14-4 अशी 10 गुणांची आघाडी बेंगळूर संघावर मिळवली होती. पुणेरी पलटनच्या खेळाडूंनी बेंगळूर बुल्सच्या भरतवर चांगलेच लक्ष ठेवले होते. या सामन्यात अस्लम इनामदार आणि मयूर कदम यांचाही खेळ उठावदार झाला. मध्यंतरावेळी पुणेरी पलटनने बेंगळूर बुल्सवर 20-10 अशी आघाडी मिळवली होती. सामन्याच्या उत्तरार्धात बेंगळूर बुल्सच्या खेळाडूनी आपल्या चढायावर पुणेरी पलटनचे गडी बाद करत आपल्या संघाला गुण मिळवून दिले. सामन्याला तीन मिनिटे बाकी असताना बेंगळूर बुल्सने पुणेरी पलटन्सचे सर्व गडी बाद केले. यावेळी दोन्ही संघामध्ये केवळ आठ गुणांचा फरक होता. बेंगळूरच्या भरतने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर पुणेरी पलटनची आघाडी कमी केली. दोन मिनिटे बाकी असताना दोन्ही संघ बरोबरीत राहिले. पण शेवटच्या मिनिटाला अस्लम इनामदारने आपल्या चढाईवर पुणेरी पलटनला दोन गुण मिळवून देत बेंगळूर बुल्सचे आव्हान संपुष्टात आणले. तामिळ थलैवाजने बंगाल वॉरियर्सचा 35-30 अशा पाच गुणांच्या फरकाने पराभव केला. या सामन्यात तामिळ थलैवाजचा नरेंदर याची कामगिरी दर्जेदार झाली. नरेंद्र, अजिंक्य पवार यांनी आपल्या चढायावर तामिळ संघाला आघाडी मिळवून दिली. तामिळनाडूने 11 व्या मिनिटाला 10-5 तर मध्यंतराला 21-13 अशी आघाडी मिळवली होती. 29 व्या मिनिटाला तामिळ थलैवाजने बंगाल वॉरियर्सवर चार गुणांची बडत राखली होती. त्यानंतर मनिंदरच्या सुपर रेडमुळे बंगाल वॉरियर्सचे आव्हान थोडे फार जिवंत राहिले. यावेळी तामिळ संघाने बंगाल वॉरियर्सवर दोन गुणांची बडत मिळवली होती. 38 व्या मिनिटाला तामिळने बंगाल वॉरियर्सवर 31-29 अशी आघाडी घेतली. तामिळ थलैवाजने शेवटच्या मिनिटाला चार गुण मिळवित हा सामना पाच गुणांच्या फरकाने जिंकला.









