वृत्तसंस्था/ पुणे
2024 च्या कबड्डी हंगामातील येथे सुरु असलेल्या 11 व्या प्रो-कबड्डी लिग स्पर्धेतील सामन्यात दबंग दिल्लीने जयपूर पिंक पँथर्सचा 33-31 अशा केवळ 2 गुणाच्या फरकाने निसटता पराभव केला.
दबंग दिल्लीच्या आशु मलिकने या सामन्यात सुपर 10 गुण नोंदविले. चालू वर्षीच्या प्रो-कबड्डी लिग हंगामात आशु मलिकने सतराव्यांदा सुपर 10 गुण नोंदविण्याचा पराक्रम केला आहे. या सामन्यातील विजयामुळे दबंग दिल्ली संघाने स्पर्धेच्या गुणतालिकेत पुन्हा तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. 11 व्या प्रो-कबड्डी लिग हंगामात दबंग दिल्ली संघाने गेल्या 14 सामन्यांमध्ये एकही सामना गमाविलेला नाही. दबंग दिल्लीचा हा एक विक्रम आहे.
सामना सुरु झाल्यानंतर दोन्ही संघांनी चढायांवर गुण नोंदवित बरोबरी साधली होती. आशु मलिक, अंकुश राठी, अर्जुन देसवाल आणि गौरव चिलार तसेच नवीन कुमार यांचा खेळ दर्जेदार झाला. अंकुश राठी आणि लकी शर्मा यांच्या अचूक चढायांमुळे जयपूर पिंक पँथर्सचे सर्व गडी बाद झाले. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये जयपूर पिंक पँथर्सच्या खेळाडुंनी आपल्या हुकमी डावपेचांवर बरोबरी करण्याचा प्रयत्न केला. पण दबंग दिल्लीने हा सामना अखेर 2 गुणांच्या फरकाने जिंकला.









