वृत्तसंस्था / चेन्नई
2025 च्या प्रो कबड्डीr लीग स्पर्धेतील चेन्नईच्या टप्प्यात खेळविण्यात आलेल्या सामन्यात दबंग दिल्ली संघाने युपी योद्धास संघाचा 43-26 अशा 17 गुणांच्या फरकाने पराभव करत गुणतक्त्यात पुन्हा आघाडीचे स्थान पटकाविले.
या सामन्यात दबंग दिल्ली संघातील अशु मलिकने सुपर 10 गुण नोंदविले तर फजल अत्राचेलीने 4 टॅकल गुण वसुल केले. सामन्याला सुरूवात झाल्यानंतर गगन गौडाने आपल्या चढाईवर दबंग दिल्लीचे दोन गडी बाद करुन आपल्या संघाला दोन गुणांची आघाडी मिळवून दिली. अशु मलिकने आपल्या अचूक चढाईवर युपी योद्धासचे काही गडी बाद करुन दबंग दिल्लीला बरोबरी साधून दिली. दरम्यान पहिल्या सत्रात युपी योद्धासने 8-6 अशी आघाडी मिळविली होती. फजल अत्राचेली याने भवानी रजपूतला बाद करत गुण वसुल केला. दरम्यान युपी योद्धासच्या खेळाडूंनी दबंग दिल्लीचे सर्वगडी बाद करुन आपल्या संघाला 14-9 असे आघाडीवर नेले. दबंग दिल्लीच्या आक्रमणाची जबाबदारी घेणाऱ्या अशु मलिकने सामन्याच्या पूर्वाधार्थ 9 गुण वसुल केले. तर गगन गौडाने याच कालावधीत युपी योद्धासला 8 गुण मिळवून दिले. मध्यंतरापर्यंत दबंग दिल्लीने युपीयोद्धासवर 17-13 अशी चार गुणांची आघाडी घेतली. उत्तरार्धातील खेळाला प्रारंभ झाल्यानंतर अशु मलिकने आपल्या चढाईवर युपी योद्धासचे खेळाडू बाद करत सुपर 10 गुण नोंदवित दबंग दिल्लीची आघाडी अधिक भक्कम केली. दबंग दिल्लीने दुसऱ्यांदा युपीयोद्धासचे सर्वगडी बाद केले. युपीयोद्धासच्या गगन गौडाने सुपर 10 गुण नोंदविले पण गुणांच्यामध्ये अधिकच फरक असल्याने दबंग दिल्लीने ही लढत 17 गुणांच्या फरकाने जिंकून वर्चस्व ठेवताना स्पर्धेच्या गुणतक्त्यात पुन्हा आघाडीचे स्थान काबीज केले आहे.









