वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2025 च्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील येथे झालेल्या चुरशीच्या सामन्यात पुणेरी पलटनने दबंग दिल्लीचा टायब्रेकरमध्ये 6-5 असा पराभव केला. या सामन्यात निर्धारीत वेळेत दोन्ही संघ 38-38 असे गुण बरोबरीत होते.
2025 च्या प्रो कब•ाr लीग हंगामातील हा टायब्रेकरवरील निकाली करण्यात आलेला दहावा सामना ठरला. या विजयामुळे पुणेरी पलटनने गुणतक्त्यात आघाडीचे स्थान पटकाविले आहे. दबंग दिल्लीविरुद्धच्या सामन्यात पुणेरी पलटन संघातील कर्णधार अस्लम इनामदाराने 6 गुण, पंकज मोहीतेने 7 गुण नोंदविले तर दबंग दिल्लीतर्फे अजिंक्य पवारने सुपर 10 गुण आणि सौरभ नंदलालने 5 गुण नोंदविले. पण त्यांची ही कामगिरी वाया गेली. या सामन्यात खेळाच्या दुसऱ्या सत्रात दिल्लीला आपले वर्चस्व राखता आले नाही. खेळ सुरू झाल्यानंतर पहिल्या 10 मिनिटांच्या कालावधीतच पुणेरी पलटनने दिल्लीवर 14-7 अशी आघाडी मिळविली होती. मोहीते आणि आदित्य शिंदे यांचा खेळ दमदार झाला. मध्यंतरावेळी दिल्लीने पुणेरी पलटनवर 21-20 अशी केवळ एका गुणाची आघाडी घेतली होती. या कालावधीत अजिंक्यने सर्वगडी बाद केले. त्यानंतर दिल्लीने दुसऱ्यांदा पुणेरी पलटनचे सर्वगडी बाद करुन 32-27 अशी भक्कम आघाडी मिळविली होती. पण कर्णधार इस्लम इनामदार, पंकज मोहीते, मोहीत गोयात यांच्या शानदार कामगिरीमुळे पुणेरी पलटनने निर्धारीत वेळेत हा सामना 38-38 असा बरोबरीत राखला. टायब्रेकरमध्ये पुणेरी पलटन्सतर्फे आदित्य शिंदे आणि मोहीत गोयात यांनी महत्त्वाचे गुण मिळविल्याने दबंग दिल्लीला हा सामना केवळ एका गुणाच्या फरकाने गमवावा लागला. या विजयामुळे पुणेरी पलटनचा संघ स्पर्धेच्या गुणतक्त्यात अव्वल स्थानावर आहे.









