दबंग दिल्ली व तामिळ थलैवाज यांच्या लढतीतील एक क्षण.
► वृत्तसंस्था / नोएडा
2024 च्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात दबंग दिल्लीने तामिळ थलैवाजचा 32-21 अशा 11 गुणांच्या फरकाने पराभव केला. या स्पर्धेच्या नोएडामध्ये सुरू असलेल्या टप्प्यात दबंग दिल्लीने एकही सामना गमविलेला नाही. या टप्प्यातील हा शेवटून दुसरा सामना आहे.
दबंग दिल्लीच्या नवीनकुमारने 11 गुण मिळविली तर या स्पर्धेत त्याने दुसऱ्यांदा सुपर-10 गुण मिळविले. या विजयामुळे दबंग दिल्लीचा संघ स्पर्धेच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असून पुणेरी पलटन पहिल्या स्थानावर आहे. दिल्ली आणि तामिळ थलैवाज यांच्यातील सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर रणजीत चंद्रनने तामिळ थलैवाजला पहिले काही गुण मिळवून दिले. मात्र आशु मलिकला तामिळ थलैवाजने आक्रमक पवित्र्यापासून थोपविले होते. पण नवीनकुमारच्या आक्रमक खेळाला त्यांना रोखता आले नाही. मोईन शफागीने आपल्या चढायांवर दिल्लीला चार आणि टॅकलमध्ये दोन गुण मिळवून दिले. सामन्याच्या मध्यंतरावेळी दोन्ही संघ 12-12 असे बरोबरीत होते. दरम्यान सामन्याच्या उत्तराधार्थ शेवटच्या 10 मिनिटांमध्ये तामिळ थलैवाजचे सर्वगडी बाद झाले आणि अखेर दबंग दिल्लीने हा सामना 32-21 अशा 11 गुणांच्या फरकाने जिंकला.









