ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुकांची शक्यता?
बेळगाव : जिल्हा पंचायत व तालुका पंचायतीच्या निवडणुकांची तयारी निवडणूक विभागाकडून केली जात आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादी करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या निवडणुका ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान घेण्याची शक्यता निवडणूक विभागाच्या सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. आगामी जि. पं., ता. पं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक तयारी करण्याची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. त्यानुसार मतदार संघानुसार मतदारयादी तयार करण्यात आली आहे. सदर यादीतील त्रूटी दूर करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने निवडणूक आयोगाकडून काम हाती घेण्यात आले आहे. मतदार यादीतील मृत व्यक्तींची नावे कमी करणे व 18 वर्षे पूर्ण झालेल्यांची नावे यादीत समाविष्ट करणे याबरोबरच आधार लिंक देण्याबाबतही प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्येक मतदाराचे आधार कार्ड यापूर्वीच घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील जि. पं. व ता. पं. मतदार संघानुसार मतदारयादी तयार करण्याचे काम गतीने सुरू आहे. अधिकृत मतदारयादी जाहीर करण्यास विलंब असल्याचे सांगण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच फायनल करण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागाच्या सूत्राकडून सांगण्यात येत आहे.









