तपशील सादर करण्याचे सीबीआयचे निर्देश
प्रतिनिधी/ बेंगळूर
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या केरळस्थित जयहिंद वाहिनीमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा तपशील देण्यास सीबीआयने नोटीस बजावली आहे. शिवकुमार यांच्याविऊद्धच्या बेकायदेशीर संपत्ती प्रकरणात नोटीस बजावण्यात आली आहे. शिवकुमार यांच्याविरोधात प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीबीआयच्या बेंगळूर युनिटने जयहिंद कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकांना 11 जानेवारी 2024 रोजी तपास अधिकाऱ्यांनी मागितलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रांसह चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
सीआरपीसीच्या कलम 91 अंतर्गत जारी केलेल्या नोटीसमध्ये सीबीआयने वाहिनीला डी. के. शिवकुमार आणि त्यांची पत्नी उषा शिवकुमार यांचे बँक तपशील आणि त्यांची गुंतवणूक, त्यांना दिलेला लाभांश, शेअर व्यवहार, आर्थिक व्यवहार यांचा तपशील देण्यास सांगितले आहे. त्यात सर्व शेअर व्यवहारांचा तपशील तसेच होल्डिंग्सचे विवरण, त्यांची लेजर खाती, कॉन्ट्रॅक्ट नोट्स आणि इतर तपशील मागितले आहेत.
सीआरपीसी कलम 91 अंतर्गत पोलीस तपास अधिकाऱ्याला चौकशी केलेल्या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे मागविण्याचा अधिकार देते. शिवकुमार यांचे पुत्र आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी चॅनेलमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा तपशील सादर करण्यास सीबीआयने सांगितले आहे. जयहिंदचे व्यवस्थापकीय संचालक बी. एस. शिजू यांनी सीबीआयची नोटीस स्वीकारली आहे. सीबीआयने विनंती केलेली सर्व कागदपत्रे उपलब्ध करून दिली जातील, असे सांगितले.









