पितांबरा पीठालाही भेट : उज्जैन दौऱ्यात राजकीय मुद्यांवरही भाष्य
► वृत्तसंस्था/ उज्जैन
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी नुकतेच उज्जैन येथे भगवान महाकालचरणी लीन होत भस्म आरतीमध्येही सहभाग घेतला. तत्पूर्वी शनिवारी त्यांनी दतिया येथील श्री पितांबरा पीठाला भेट दिली. उज्जैन दौऱ्यामध्ये त्यांनी राजकीय मुद्यांवरही भाष्य केले. हिंदुत्व आणि मंदिर ही कोणाचीही वैयक्तिक मालमत्ता नाही. कर्नाटकप्रमाणेच मध्यप्रदेशातील जनताही भाजपच्या भ्रष्टाचाराने हैराण झाली असल्यामुळे आता मध्यप्रदेशातही आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी उज्जैनमधील प्रसिद्ध बाबा महाकाल यांची पूजा करत आशीर्वाद घेतले. महाकाल मंदिराचे पुजारी पंडित आशिष गुरू आणि पंडित महेश पुजारी यांनी त्यांच्या उपस्थिती गर्भगृहात पूजा-अर्चा केली. त्यानंतर त्यांनी नंदीच्या कानात आपली इच्छाही व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार महेश परमार, आमदार जितू पटवारी, शहर काँग्रेस अध्यक्ष रवी भदोरिया, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष कमल पटेल आदी नेते उपस्थित होते.
समृद्धीसाठी प्रार्थना
महाकाल दर्शन आणि पूजेनंतर शिवकुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महाकालेश्वराच्या कृपेने आम्हाला कर्नाटकातील जनतेची सरकार म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली आहे. निवडणुकीपूर्वीच मी इथे आलो होतो. आता कर्नाटकातील जनतेसह देशाच्या समृद्धीसाठी मी देवाकडे प्रार्थना करण्यासाठी पुन्हा आलो असल्याचे त्यांनी विषद केले. कर्नाटकप्रमाणेच मध्यप्रदेशातील जनताही भाजप सरकारच्या भ्रष्टाचारामुळे त्रस्त असल्यामुळे येथे येत्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर येईल, असे ते म्हणाले. कमलनाथ, दिग्विजय सिंह यांच्यासह सर्व नेते एकत्र काम करत आहेत. कर्नाटकपेक्षा मध्यप्रदेशात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.









