प्रतिनिधी/ बेंगळूर
काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात अनेक मोफत योजनांचा वर्षाव केला असून बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे. बजरंग दलावर बंदी घालण्याची घोषणा केल्यामुळे भाजपसह हिंदुत्त्ववादी संघटनांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यातून आक्षेपार्ह घोषणा वगळणार असल्याची चर्चा होती. मात्र, यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी स्पष्टीकरण दिले असून जाहीरनाम्यात बदल करण्याचा प्रश्नच नाही, असे म्हटले आहे.
काँग्रेसने बजरंग दलावर बंदी घालण्याची घोषणा करताच त्याचे पडसाद उमटत आहेत. भाजप नेत्यांनी काँग्रेसला हिंमत असेल तर बजरंग दलावर बंदी घालून दाखवावी, असे आव्हान दिले आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना शिवकुमार यांनी आम्ही निर्णयातून माघार घेणार नाही. हनुमंताचा बजरंग दलाशी कोणता संबंध?, असा प्रश्न करून त्यांनी हनुमंत वेगळा आणि बजरंग दल वेगळा, असे सांगितले.
ते पुढे म्हणाले, आम्ही सर्वजण अंजनेयभक्त आहोत. बजरंगी अशी ओरड करत फिरणे महत्त्वाचे नव्हे. महागाईसह अनेक समस्या बाजूला ठेऊन भाजप धर्माचे राजकारण करत आहे. बजरंग दल कायद्याचा दुरुपयोग करत आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेला धक्का पोहोचत आहे. नैतिक पोलीसगिरी करून समाजातील शांतता भंग केली जात आहे, असा आरोपही शिवकुमार यांनी केला.









